उच्च पौष्टिक मूल्य वाढीबरोबर जैवविविधता टिकवण्यासाठी तृणधान्ये महत्त्वाची

0
10

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३

मिलेट्स म्हणजे सोप्या भाषेत भरडधान्ये अथवा तृणधान्ये होय. अत्यंत पौष्टिक अशी ही तृणधान्ये आपल्या आहारात असायलाच हवीत. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळा, कुटकी, यासारख्या भरडधान्य/तृणधान्याचे महत्त्व लक्षात घेऊन यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या वर्षभरात तृणधान्य सेवनासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम आता देशपातळीबरोबरच राज्यभर सुरू आहे. तृणधान्यातील उच्च पौष्टिक मूल्य वाढीबरोबरच या वसुंधरेवरील जैवविविधता टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे काम होत असते. त्याबरोबरच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या विकासातही यामुळे हातभार लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने शेतकऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांमध्येही भरडधान्यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. तृणधान्य पिकविणारे शेतकरी, तृणधान्यासंबंधी संशोधन करणारे तज्ञ, संशोधक, आहारतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. याशिवाय महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, शेतकरी, सामान्य नागरिक यांच्यापर्यंत विविध उपक्रमांद्वारे  प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे.

भारत सरकारने प्रस्तावित केल्या प्रमाणे संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या प्रस्तावास ७२ देशांनी समर्थन दर्शवले आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष लोक चळवळ होण्याच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष साजरे करण्याचे ठरवले आहे.

प्रमुख उद्देश

  • पौष्टिक तृणधान्याचा क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे.
  • पौष्टिक तृणधान्याची मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे.
  • पौष्टिक तृणधान्याचा लोकांच्या आहारातील वापर वाढविणे.
  • पौष्टिक तृणधान्याचे आहारविषयक व आरोग्य विषयक महत्त्व पटवून देण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करणे.
  • उत्पादन व आहारातील वापर वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
  • पौष्टीक तृणधान्याच्या निर्यातील चालना देणे.

पौष्टिक तृणधान्य लागवडीचे व वापराचे फायदे

  • वापरकर्त्यासाठी फायदे :- कमी ग्लायसेमिक इंडेक्स, ग्लुटेनमुक्त, खनिजे, जीवनसत्वे व Antioxidants ने भरपूर, उष्माकाचा उत्तम खोत, तंतुमय पदार्थ, प्रथिने जास्त.
  • शेतकरी यांच्यासाठी फायदे :- कमी कालावधीची पिके, कमी पाणी लागणारी पिके, हवामान बदलास अनुकूल, तग धरणारी पिके.
  • वसुंधरेसाठी फायदे :- हलक्या जमिनीत येणारी, झिरो कार्बन फुटप्रिंट.

    पौष्टिक तृणधान्याचे विविध उपयोग

  • पौष्टिक तृणधान्य दळून त्याच्या पिठापासून बनवता येणारे पदार्थ :- भाकरी, इडली, डोसा, खाकरा, ठेपला, ब्रेड, पिझ्झा ब्रेड, बिस्कीट कुकीज), केक, नमकीन, नुडल्स, पास्ता, लाडू, न्यूट्रीबार, चकली, पापड, आप्पे, लापशी बर्फी, शेव इ.
  • पौष्टिक तृणधान्य शिजवून करता येणारे पदार्थ – भात, खिचडी, उपमा, खीर इ.
  • पौष्टिक तृणधान्यापासून सत्व बनविता येतात :- नाचणी सत्व इ.
  • पौष्टिक तृणधान्याचे प्रक्रिया पदार्थ :- फ्लेक्स, पॉप्स, कुरकुरे इ.

 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य योजनेंतर्गत घेतलेले कार्यक्रम / उपक्रम

  आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य योजनेंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने जानेवारी २०२२ व फेब्रुवारी २०२३ मध्ये जिल्हास्तर / तालुकास्तर/ ग्रामस्तर येथे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये पाककला स्पर्धा, आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांना संशोधकांकडून मार्गदर्शन, शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी, शेतकरी व नागरिकांना घडीपुस्तिकेचे वाटप अशा अनेक प्रकारे पौष्टिक तृणधान्याविषयी जनजागृतीसाठी उपक्रम हाती घेण्यात आले.

            कृषिप्रधान म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी आदी पिके घेतली जातात. या पिकांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. पिकांमध्ये विविधता आणण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याची हमी मिळेल. महाराष्ट्र मिलेट मिशनमुळे आजची नवी पिढी जंक फूडकडून पारंपरिक तृणधान्याद्वारे बनविलेल्या पदार्थाकडे निश्चितपणे वळेल.

–  श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

०००

  – नंदकुमार वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here