अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
12

ठाणे, दि. १७ (जिमाका) : अंबरनाथ शहराची वाढ होत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे ७७५ कोटींचा निधी दिला आहे. या शहराकडे माझे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असून येथील विकासासाठी सढळ हस्ते मदत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अंबरनाथ शिवमंदिर येथे डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, नरेंद्र पवार, गोपाळ लांडगे, सुनील चौधरी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी शिव मंदिरात जाऊन श्री महादेवाचे पूजन करून दर्शन घेतले.

यावेळी प्राचीन शिवमंदिरवरच्या गाण्याचे सादरीकरण कलाकारांनी केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्मिती केलेल्या अंबरनाथच्या विकासावरील लघुपटाचे सादरीकरण झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराला यापूर्वीही भेट दिली आहे. मात्र आता शिव मंदिर परिसर बदलत असून येथे विकास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर 138 कोटी रुपये शिवमंदिर परिसराच्या विकासासाठी दिले. त्याशिवाय या शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी घनकचरा प्रकल्पासाठी १५० कोटी, रस्त्यांच्या कामासाठी २२२ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेतून १०७ कोटी, दलित वस्तीमधून 32 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण मधून ७८ कोटी, इतर कामासाठी दिले ४८ कोटी निधी दिला आहे.

अंबरनाथ वाढतंय, या वाढत्या शहराच्या गरजाही मोठ्या आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि निधी मिळविला. त्याचबरोबर या शहराची सांस्कृतिक गरज देखील भागवली पाहिजे म्हणून अशा प्रकारचा मोठा शिवमंदिर फेस्टिवल त्यांनी सुरू केला आणि म्हणून हजारो लोक या ठिकाणी त्याचा आनंद घेतायत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

हे राज्य सर्व सामान्य लोकांच्या मनातलं राज्य आहे. आपल्या अर्थसंकल्पमध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, मुली, विद्यार्थी अश्या सगळ्यांचा विचार केला आहे. त्याच बरोबर प्राचीन मंदिर व गडकिल्ल्यांचे संवर्धन जतन देखील करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छामुळे या राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरावती येथे मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, अंबरनाथ शहराचा विकास करताना प्रशासनाने चांगली साथ दिली. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने या शहराचा विकास होत आहे. ज्या सोयीसुविधा महानगरपालिका देते त्याच प्रकारच्या सोयी अंबरनाथ नगरपरिषदेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. यामध्ये मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांचा मोठे सहकार्य आहे. या ठिकाणी प्रशासन आणि शासन एकत्र काम करत आहे. त्याचबरोबर सगळ्या लोकप्रतिनिधीचे मार्गदर्शन या अंबरनाथच्या विकासासाठी लाभत आहे.

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here