सातारा दि. १९ – जिल्हा वार्षिक योजना मधून जिल्ह्यातील विविध विकास कामे होत असतात. ज्या ज्या विभागांना या योजनेमधून निधी प्राप्त झाला आहे त्या त्या विभागांनी येत्या ३१ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या निधी शंभर टक्के खर्च करावा असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पालकमंत्री श्री देसाई यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे जिल्हा वार्षिक योजनेचा आज पुन्हा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व विभाग प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी १००% खर्च करावा अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासकीय इमारती बांधकाम निधी शंभर टक्के खर्च करावा. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी शंभर टक्के खर्च करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत नियोजनबद्ध काम करावे. येत्या ३१ मार्च पर्यंत विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये.
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा खर्चाचा आढावा रोज घेणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्याचा निधी जो खर्च होणार नाही तो निधी रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा परिषदेकडे तात्काळ वर्ग करावा. पोलीस विभागाला जिल्हा वार्षिक योजनेतून वाहने व संगणक खरेदीसाठी निधी प्राप्त झाला आहे तो निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केल्या.
000