सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या प्रदर्शनास महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ठाणे दि. 19(जिमाका) :- अनुसूचित जाती जमाती व नवबौध्द घटकांसाठी असलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व या घटकांना त्याचा लाभ कशा प्रकारे घेता येईल, याची माहिती देण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्फत जिल्ह्यातील विविध महाविद्यालय व  औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली जात आहे. महाविद्यालयांमधील या प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून योजनांचा लाभ कसा घेता येईल या बद्दल विद्यार्थी जाणून घेत असल्याचे दिसून येत आहे.

सामाजिक न्याय विभागांच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेतून जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये एक दिवशीय प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे स्टँडिद्वारे माहिती देण्यात आली आहे.

भाईंदर येथील प्रविण पाटील कॉलेज, कल्याणमधील बिर्ला महाविद्यालय, वाशी येथील एफ.आर.सी महाविद्यालय, उल्हासनगर येथील एस.टी कॉलेज, या महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, रमाई आवास योजना, नवउद्योजकांसाठी असलेली स्टँडअप योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांसाठी असलेली मिनी ट्रॅक्टर योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.