शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. २० (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला चोवीस तास वीज उपलब्ध होण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील 33/11 के.व्ही. उपकेंद्राच्या भूमीपूजनावेळी पालकमंत्री डॉ. श्री. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि. प. सदस्य सुनील गावित, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा जि.प. सदस्य भरत गावित, सरपंच  रशीला वळवी,(पाटीबेडकी ), जयराम कुवर (दापूर ) रमेश गावित (करंजी ब्रु), काशिराम गावित (कामोद), उपसंरपच स्वप्निल गावित, तहसिलदार मंदार कुलकर्णी,  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी, कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग अनिरुद्ध नाईकवाडे, यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. श्री. गावित म्हणाले की, शेतीला पाणी देण्यासाठी विजेची गरज लक्षात घेऊन वीजेचा अखंड पुरवठा करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी नवीन वीज केंद्र उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार पाटीबेडकी येथील 33/11 के.व्ही उपकेंद्र येथे 3 फीटर कार्यान्वित होणार असून 2 फीटर हे शेतीसाठी व 1 फीटर हे घरगुती वीजेसाठी उपलब्ध होणार आहे. हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यावर या परिसरातील कोळदा, सुळी, सोनखडका, करंजी, पाटी, पाटीबेडकी, पिपराण, बोरपाडा, वडखुट, कामोद, खोकसा, बोमदीपाडा येथील नागरिकांना घरगुती व शेतीला पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होणार आहे.

नवापूर येथे 132 के.व्हीचे नवीन केंद्र येथे उभारण्यात मंजूरी देण्यात आल्यामुळे या तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. येत्या काळात आपल्या भागात बारमाही वीज मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन विद्युत पोल टाकणे, जुन्या तारा बदलणे, नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसविण्यासाठी केंद्र शासनामार्फत निधी  उपलब्ध होणार असल्याची माहिती  त्यांनी यावेळी दिली.

नवापूर तालुक्यात पाण्याचे स्त्रोत चांगले असल्यामुळे तालुक्यातील 100 टक्के शेतीला पाणी पोहचविण्याचे नियोजन येत्या काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात सिंचनासाठी पाटचाऱ्या नाहीत अशा ठिकाणी नवीन पाटचारे काढण्यात येईल. तसेच जुन्या पाटचारी दुरुस्तीची कामे येत्या काळात करण्यात येतील. त्यामुळे येथील शेती जास्तीत जास्त सिंचनाखाली येऊन शेतीचे उत्पन्नात वाढ होईल. शेतमालाची आवक वाढल्यास मालावर प्रक्रिया करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शेती प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य व प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे येथे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन स्थलातर थांबेल. रोजगार हमी योजनेतून नवीन विहीर बांधण्यासाठी विविध योजनेमार्फत कमी अधिक रक्कम देण्यात येते त्यामुळे नवीन विहीर बांधण्यासाठी एकसमान रक्कम उपलब्ध होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांनीही अखंडीत विजेचा पुरवठा होण्यासाठी आपल्या कृषी पंपाचे वीज देयक नियमित भरुन महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी केले.

जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत खामगांव, पाचोराबारी, वाघाळे, गुजरभवाली तालुका नंदुरबार येथील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन पार पडले.

०००