मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि.२०: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम मे २०२३ अखेर, तर दुसऱ्या मार्गिकेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होईल. हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.
मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, मागील दहा वर्ष हे काम सुरू आहे. यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीत असलेल्या अडचणी दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. पनवेल ते इंदापूर रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी पनवेल ते कासू रस्त्यासाठी १५१ कोटी रुपये, तर कासू ते इंदापूर रस्त्यासाठी ३३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामासाठी दोन वेगवेगळ्या संस्था नियुक्त केल्या असून त्यांच्यामार्फत काम सुरू आहे. या रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी ड्रोन बसविण्यात आले आहेत. रोजच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.
या प्रश्नांच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री जयंत पाटील, भाई जगताप, महादेव जानकर, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे यांनी उप प्रश्न उपस्थित केले.
००००
संध्या गरवारे/विसंअ/
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. २० : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत सदस्य किरण सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, सध्या आपण जे वेतनेतर अनुदान देतो. त्याला २६६ कोटींची कॅप निश्चित केली होती. त्याच्यानंतर हा प्रश्न उच्च न्यायालयाकडेही गेला होता. उच्च न्यायालयाने शाळांना किती खर्च होतो याबद्दल ऑडिट केलेली माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे माहिती मागविण्याचे काम सुरू आहे. उच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे व त्याची अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यकता तपासून याबाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
या चर्चेत जयंत आसगावकर, विक्रम काळे, एकनाथ खडसे, निरंजन डावखरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. त्यालाही मंत्री श्री. केसरकर यांनी उत्तर दिले.
000
दीपक चव्हाण/विसंअ/
बनावट औषध विक्रीवर नियंत्रणासाठी संगणक प्रणाली विकसित करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. २० : बनावट औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या काळात उत्पादक – विक्रेते – ग्राहक अशी संगणक प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज विधानपरिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. राठोड म्हणाले की, मुंबईमध्ये औषध विक्री दुकानातून खरेदी केलेल्या इंजेक्शनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी तपासानंतर ते इंजेक्शन बनावट असल्याचे उघडकीस आले. त्याप्रकरणी पोलिसांत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बनावट औषध आणि गोळ्या विक्रीची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी विक्रेते आणि उत्पादकांची तपासणी करण्यात आल्याचे मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले. राज्यात एकूण १ लाख १८ हजार परवाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. तपासणी दरम्यान ८९ हजार किरकोळ विक्रेते, २८ हजार ८५५ घाऊक विक्रेते आणि ९९६ उत्पादक यांची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ४५० परवाने निलंबित करण्यात आले असून ५५२ परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. केंद्र सरकार ऑनलाईन औषध विक्री संदर्भात धोरण तयार करीत आहे. याशिवाय, परराज्यातून येणाऱ्या अशा प्रकारच्या बनावट औषध विक्री संदर्भात कडक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी, सदस्य अभिजित वंजारी, ॲड. अनिल परब, भाई जगताप, ॲड. मनीषा कायंदे आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले. त्यालाही मंत्री श्री. राठोड यांनी उत्तर दिले.
000