महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, गोंडी पेंटींग व बांबूची उत्पादने लक्षवेधक

0
14

नागपूर दि.२०:   जी-२० अंतर्गत सिव्हिल सोसायटीची (सी-20) परिषद सुरू असलेल्या  रेडिसन ब्लू येथे लावलेल्या हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनातून विदेशी पाहुण्यांना भारतीय संस्कृती व कलेचे दर्शन घडत आहे. या प्रदर्शनातील 11 पैकी 8 स्टॉल महाराष्ट्राच्या विविध विभागाचे आहेत. या स्टॉलवर सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी  विविध वस्तूंची खरेदी करत या सांस्कृतिक कलेची औत्सुक्याने माहिती जाणून घेतली.  विदेशी पाहुण्यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद प्रदर्शनात दिसून येत होता.

            महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या स्टॉलवर बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक शोभिवंत वस्तू सर्वांच्या लक्ष वेधून घेत होत्या. यात प्रामुख्याने बांबूपासून तयार केलेले पेन, डायरी, टूथब्रश, कंगवा, टेबल लॅम्प इत्यादी विविध वस्तूंचा समावेश होता.

            भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या आदिवासी विभागाच्या स्टॉलवर आदिवासी कला, संगीत, नृत्य, गायन व लोककला इ. आदिवासींचे सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या लक्षवेधक गोंडी पेंटिंग, लोह व झिंक चे जास्त प्रमाण असलेला भंडाऱ्याचा सुगंधी  तांदुळ, वारली पेंटिंग असलेल्या जीआय टॅगिंग टसर सिल्क साड्या तसेच वनधन विकास केंद्राद्वारे हिरडा, बेहडा, भुईनिम, मशरूम पावडर आदी वनउपजापासून तयार करण्यात आलेले अन्नपदार्थ व वनौषधी होत्या.

            सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या स्टॉलवर महात्मा गांधी यांचेवर लिहलेली विविध पुस्तकें व चरख्याच्या प्रतिकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. येथे पेटी-चरख्यावर सुतकताई करून दाखविण्यात येत होती. तसेच ऑरगॅनिक कॉटनचे व ऑरगॅनिक हळद उत्पादने ठेवण्यात आले होते.

            यासोबतच महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या स्टॉलवरील हातमागचे कपडे, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान च्या स्टॉलवरील महिला बचत गटाची उत्पादने तसेच  महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उत्पादने पाहूण्यांना आकर्षित करत होती.

            भारत सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलवर कर्नाटकचे बिदरी आर्ट, मणिपूरचे लॉन्गफी पॉटरी, जम्मू काश्मीरच्या पश्मीना शॉल व स्ट्रोल, ओडीसाच्या डोंगरीया साडी व स्ट्रॉल तसेच सौरा पेंटिंग व डोकरा ज्वेलरी, महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, हिमाचल येथील मेंढी व याकच्या लोकरीचे शाल व स्ट्रोल, गुजरातचे वाल हैंगिंग यासोबतच राजस्थानच्या मिताकारी वर्क आणि अॅपलीक वर्कच्या साड्या व दुपट्टे प्रदर्शनात होते.

            माता अमृतानंदमयी  मठाच्या स्टॉलवर आश्रमाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी करण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती तसेच त्यांची पुस्तके, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीच्या स्टॉलवर प्रबोधनीची प्रकाशने, विवेकानंद केंद्र नागपूर शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती व त्यांचे साहित्यपुस्तके ठेवण्यात आली होती. तर सत्संग फाउंडेशन च्या स्टॉलवर पाणी व्यवस्थापनेबाबत माहिती देण्यात येत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here