वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांच्या समृद्धीसाठी वन महत्त्वाचे आहे. दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात वने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्यादृष्टीने फायद्याचे असूनही वणवा, कीटक, दुष्काळ आणि अभूतपूर्व जंगलतोड यामुळे जंगले धोक्यात आली आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या वन दिनाच्या निमित्ताने ‘वन आणि आरोग्य’ या संकल्पनेबाबत चर्चा होणार आहे.
वने मानवजातीच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महत्त्वाचे आहेत. अलिकडच्या काळात अन्न सुरक्षा आणि पोषणासाठी जंगलांचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे, परंतु मानवी आरोग्यासाठी त्यांच्या भूमिकेकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नाही. पोषण आणि आरोग्य हे परस्पर जोडलेले असून त्यादृष्टीनेही वनांच्या महत्त्वाकडे पहायला हवे.
जंगले सुमारे 2.5 अब्ज लोकांना वस्तू , सेवा, रोजगार आणि उत्पन्न देतात. 2013 मध्ये झालेल्या जागतिक अन्न आणि कृषि संघटनेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेपासून अन्न सुरक्षा आणि पोषणाच्यादृष्टीने वनांचे महत्व विशद करण्यात येत आहे. जागतिक अन्न सुरक्षा समितीनेदेखील ऑक्टोबर 2017 मध्ये यासाठी शाश्वत वनीकरणावर भर दिला.
जैवविविधतेने समृद्ध वन परिसंस्थेमुळे आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त आहारासाठी फळे, पाने, मशरूम आणि यासोबतच मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती मिळतात. जंगलांशी निगडीत असलेले गोड्या पाण्याचे स्त्रोत, पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण, पूर नियंत्रण, जमिनीची सुपीकता हे मानवी आहार आणि आरोग्याशी जोडलेले घटक आहेत. जंगलाच्या समीप राहणाऱ्या लोकांच्या पोषणाचा आणि वैद्यकीय उपचारांचा आधार जंगलातील वनस्पती आणि प्राणी आहेत. या संदर्भांत सुंदर सहजीवन विकसीत झाल्याची उदाहरणे जंगलाच्या परिसरात पहायला मिळतात.
शहराजवळ असलेल्या नागरिकांना जंगलामुळे अनेक प्रकारे अप्रत्यक्ष लाभ होतो. जंगलामुळे वातावरणातील कार्बनच्या प्रमाणावर नियंत्रण येत असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होते. झाडे ऑक्सिजनचा नैसर्गिक स्त्रोत आहेत. तापमान नियंत्रण आणि हवा शुद्धीकरणासाठीदेखील जंगल महत्त्वाचे आहे. वनराईतील व्यायाम, निसर्गातील भटकंती तणावमुक्ती व मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची असल्याचे युरोपमध्ये झालेल्या अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळेच निसर्ग पर्यटनाचे महत्व वाढताना दिसत आहे. मानसिक, शारीरिक आणि सामाजिक अशा तिन्ही प्रकारच्या स्वास्थ्यासाठी जंगलांचे महत्त्व आहे.
लाखो ग्रामीण महिला, पुरुष आणि मुलांना जंगलातील खाद्यपदार्थांपासून सूक्ष्म पोषक घटक मिळतात. काजू, कंदमुळे, फळे, बिया, मशरूम, कीटक, पाने, मध, मांस, डिंक आदी खाद्यपदार्थ वनाद्वारे प्राप्त होतात. वनाच्या माध्यमातून जगभरात निर्माण होणारे 5 कोटी 40 लक्ष थेट रोजगार अन्न खरेदीसाठी सक्षम करतात आणि त्याद्वारे निरोगी आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी मदत करतात. जंगलाच्या माध्यमातून वर्षभर वैविध्यपूर्ण आहार घटक प्राप्त होतात. इंधनासाठी लाकडाचा वापर होत असल्याने अन्नावर प्रक्रीया होऊन जलजन्य आजार कमी होण्यास मदत होते.
कसावा, तारो, याम आणि रताळे हे कर्बोदकांचे स्त्रोत आहेत. रेजिन, सॅप्स, हिरडा आणि मध प्रथिनांनी समृद्ध असतात. तर मशरूममध्ये भरपूर खनिजे असतात. रानभाज्यांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. प्रथिनांनी समृद्ध असलेली फळे, बीया, पामतेल, पाने आणि लहान जीव वाढीसाठी उपयुक्त असतात. जंगलात मिळणारे मध विविध आजारांवर गुणकारी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 80 टक्के लोकसंख्या प्रथमोपचारासाठी पारंपरिक औषधांवर अवलंबून असतात आणि अशी औषधे जंगलात मुबलक प्रमाणात असतात. भारतातील आयुर्वेदीक उपचाराचे महत्त्व जगभराने मान्य केले आहे. यातील हिरडा, बेहडा, अर्जुन, आवळा, वावडींग, धावडा, बेल अशा विविध प्रकारच्या औषधी वनस्पती जंगलात आढळतात. उत्तर भारतात 33 प्रकारचे मशरूम हे रक्त, हृदय, सांधेदुखी आणि श्वसनाशी संबंधीत आजारांवर उपचारसाठी उपयुक्त असल्याचे अभ्यासात आढळले आहे. गतकाळात उपचारासाठी महत्त्वाचा असलेला ‘आजीबाईचा बटवा’ अशाच वनौषधीनी समृद्ध होता.
डेन्मार्क आणि स्वीडनसारख्या देशांनी आरोग्य वने ही संकल्पना पुढे आणताना मोकळी हवा, गवताचे सुनियोजित आच्छादन, स्थानिक वनस्पती, पशू, पक्षी, शांतता, वाहनांना प्रतिबंध, बाह्यजगापासून दूर, रस्त्याच्या सभोवती दाट झाडी, झुडपे आणि मुले खाद्य देऊ शकतील अशा प्राण्यांची बहुलता आदी विविध घटकांना महत्व दिले आहे. वन दिनाच्या निमित्ताने अशा नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आणून आपणही हिरवे आच्छादन जपूया आणि आपल्या निरोगी आयुष्याची पायाभरणी करूया!
-डॉ.किरण मोघे,
जिल्हा माहिती अधिकारी, पुणे