वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 21 : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वस्त्रोद्योग आयुक्त आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात 500 अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असे म्हणणे चुकीचे आहे. मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला हलविण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.

००००

काशीबाई थोरात/ विसंअ/