पाणी शाश्वत विकासाचा केंद्रबिंदू आहे. सामाजिक-आर्थिक विकास, ऊर्जा आणि अन्न उत्पादन, निरोगी परिसंस्था आणि मानवी जगण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. पाणी समाज आणि पर्यावरण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते, हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्यादृष्टीनेदेखील पाण्याला महत्त्व आहे.
प्रत्येक व्यक्तीला पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणी उपलब्ध होणे हे त्याच्या हक्काशीही निगडीत आहे. वाढत्या जागतिक लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध घटकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जल व्यवस्थापनावर भर देण्याची गरज वाढते आहे. त्यासोबतच मानवी आरोग्याच्यादृष्टीनेदेखील यावर विचार होणे आवश्यक आहे.
दरवर्षी अशुद्ध पाणी, सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव आणि अस्वच्छतेमुळे सुमारे 14 लक्ष व्यक्ती आपला जीव गमावतात आणि 7 कोटी 40 लक्ष व्यक्तींचे आरोग्यही धोक्यात येते. युनिसेफच्या अहवालानुसार जगातील एक चतुर्थांश जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. दरवर्षी दूषित पाण्यामुळे 2 लक्ष 97 हजार बालकांचा मृत्यू होतेा. ही आकडेवरील लक्षात शुद्ध पाण्याचे महत्त्व लक्षात येईल.
बिघडलेल्या जलचक्रामुळे आरोग्यापासून उपासमारीपर्यंत, लैंगिक समानता ते नोकऱ्यांपर्यंत, शिक्षणापासून उद्योगापर्यंत आणि आपत्ती व्यवस्थापनासारख्या सर्व प्रमुख जागतिक समस्या सोडविण्यात अडथळे निर्माण होतात. 2050 पर्यंत जगात पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. म्हणून प्रत्येकाने जलचबचतीच्या संदर्भात आपापल्या स्तरावर आतापासूनच कृती करणे आवश्यक आहे.
पाणी आणि स्वच्छता ही जीवनाची पूर्वअट आणि प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे. शाश्वत विकासासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. येत्या काही वर्षांत, पाण्याशी संबंधित आपली आव्हाने अधिक तीव्र होतील. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची वाढती मागणी आणि वेगाने विकसित होत असलेली जागतिक अर्थव्यवस्था आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे घरगुती वापरासाठी आणि इतरही उपयोगासाठी पाण्याचा अभाव वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते यामुळे भविष्यात सामाजिक-आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
पाण्याशी संबंधित आव्हानांना तोंड देण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी, संयुक्त राष्ट्र महासभेने ‘शाश्वत विकासासाठी पाणी’ या विषयाबाबत 2018-2028 हे आंतरराष्ट्रीय कृती दशक म्हणून घोषित केले आहे.
पाण्याशी संबंधित सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जलस्रोतांच्या शाश्वत विकासावर आणि एकात्मिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सोबतच समाजातील सर्व घटकांचा सहभाग निश्चित केल्यास पाण्याचा सुयोग्य वापर निश्चित करता येईल.
आपण काय करू शकतो
पाण्याचा सुयोग्य वापराचा विचार समाजातील प्रत्येक स्तरावर झाल्यास या जागतिक समस्येवर मात करणे शक्य आहे. घरगुती किंवा उद्योग क्षेत्रातील पाण्याच्या वापरात बचत करणे हे पहिले पाऊल ठरू शकेल. त्यासोबत मोठ्या गृह निर्माण संस्था, उद्योग, मोठी रुग्णालये आदींनी सांडपाण्यावर प्रक्रीया करण्याची स्वत:ची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. दूषित पाण्यामुळे जलस्त्रोत आणि भूजल दूषित होत असल्याने एकूणच पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे.
हवामानाचा लहरीपणा आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता जलसंधारणही महत्त्वाचे आहे. नदी-नाल्यातून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी जमिनीवर पडते तिथेच अडविण्याचे व जिरविण्याचे प्रयत्न झाल्यास भूजलाची पातही वाढण्यासोबत शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होईल. जलयुक्त शिवार 2.0 आणि शासनाची शेततळे योजना यासाठीच आहे. गावतपातळीवर उतारावरील पाणी लहान बंधाऱ्याच्या माध्यमातून अडविल्यास विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होऊ शकेल.
शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांचाही जलसंधारणातील सहभाग महत्त्वाचा आहे. पाण्याचे स्त्रोत निर्माण होण्यासोबत जलसाक्षर पिढी घडविण्यासाठी हा सहभाग उपयुक्त ठरू शकेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जलवाहिन्यांमधील गळती रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्यास शुद्ध पाण्याचा सुयोग्य वापर होण्यास मदत होईल. सर्वांनी मिळून ‘प्रत्येक थेंब अडवूया’ हे घोषवाक्य आपल्या पुढील कृतियोजनेचे उद्दिष्ट म्हणून स्वीकारल्यास पाण्याच्या संकटावर मात करणे सहज शक्य आहे आणि तरच शुद्ध पाणी व स्वच्छता सुविधेच्या आधारे आपले निरोगी आणि सुरक्षित भविष्य घडविणे शक्य आहे.
1993 पासून दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून जल आणि स्वच्छताविषयक जागरूकता वाढविण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक जलसंकटावर मात करण्याबाबत विचारमंथन या दिवसाच्या निमित्ताने होत असते. यूएन-वॉटरद्वारे या दिवसाचे आयोजन केले जाते.
जंगलाला लागलेली आग विझविण्यासाठी आपल्या चोचीने एक-एक थेंब पाणी टाकणाऱ्या चिमणीच्या गोष्टीवर आधारीत ‘अपेक्षित असणारा बदल तुम्ही घडवा’ अशी संकल्पना घेऊन यावर्षीचा जागतिक जल दिन साजरा होत आहे. अर्थात पाण्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
– डॉ.किरण मोघे,
जिल्हा माहिती कार्यालय पुणे