शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन राबविणार- पालकमंत्री अब्दुल सत्तार

0
8

हिंगोली (जिमाका), दि. 25  :  नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयाची नानाजी देशमुख कृषि संजीवनी  योजना टप्पा दोन ही योजना राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

हिंगोली येथील रामलीला मैदानावर दि. 25 ते 28 मार्च, 2023 या कालावधीत आयोजित चार दिवशीय जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज करण्यात आले . यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हेमंत पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव माने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रा मणी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे, हळद संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक रविशंकर चलवदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. अब्दुल सत्तार म्हणाले, या कृषि महोत्सवात कृषि विभागाशी संबंधित योजना, साहित्य, अवजारे, नवनवीन तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे दरवर्षी कृषि महोत्सवाचे आयोजन करावेत आणि याची माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. तसेच पाण्याशिवाय शेतीची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे इसापूर धरणातील व येलदरीचे पाणी हिंगोलीला आणण्यासाठी व सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हिंगोली  जिल्ह्याचा सिंचनाचा लवकरच  प्रश्न सोडविण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागातील 80 टक्के रिक्तपदे येत्या सहा महिन्यात भरण्यात येणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

नुकतेच वादळी  वारा व पावसामुळे झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे सुरु असून ते लवकरच  पूर्ण करण्यात येणार आहे. याची मदत शेतकऱ्यांना लवकरच  देण्यात येणार आहे. गत सहा महिन्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली असून, या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या वार्षिक आर्थिक मदतीत 6 हजार रुपयांची भर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात घालण्यात येणार आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्य शासनाचे दरवर्षी 12 हजार रुपये  सन्मान निधीमध्ये ही रक्कम मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना 1 रुपया भरुन योजनेत सहभागी  होता येणार आहे. शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम विमा शासन भरणार आहे. त्यासाठी शासनाने तरतूद केली आहे. तसेच शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून शासन त्याच्या कुटुंबियाच्या खात्यावर दोन लाख रुपये जमा होणार आहे. तसेच निराधारांनाही आधार म्हणून शासनाने त्यांच्या मानधनात वाढ केली आहे.  त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करीत आहे. विषमुक्त शेती करण्यासाठी नव नवीन बियाणे तयार करुन शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे व शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडवून आणण्याचे काम करावे,असे आवाहनही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले, येलदरीचा कालवा कयाधू नदीपर्यंत आणून सोडला तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी शासनाने हिंगोलींचा सिंचनाचा अनुशेष दूर करावा. तसेच हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून ना उद्योग जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्याचे काम होत आहे. यासाठी शासकीय योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावेत, असे सांगितले.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने यांनी  हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष दूर करावा. नाफेड खरेदी केंद्र वाढवावेत, अशी मागणी त्यांच्या मनोगतात केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रा मणी यांनी विद्यापीठाद्वारे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले. शेवटी आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या अगोदर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा कृषि महोत्सवात लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन करुन विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी प्रगतीशील शेतकरी, महिला बाकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला सुशिला जयाजी पाईकराव, श्रीहरी कोटा येथे जाणाऱ्या आठ मुलांचा सत्कार यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हळद लागवड तंत्रज्ञान भितीपत्रिका व पौष्टीक भरडधान्य या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

*****

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here