महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पनवेल आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते होणार भूमीपूजन

0
6

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त संकुल इमारतीचे सोमवारी दि. २७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे.

या भुमीपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यातील युवक- युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कामकाज लवकरच सुरु करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दर्जेदार कौशल्य शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण उपलब्ध होण्याकरिता ५ कौशल्य प्रशालांची (Schools) व त्याअंतर्गत अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय सध्या तात्पुरत्या स्वरुपात एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालय, मुंबई येथे सुरु करण्यात आले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथील १० एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांचे एकत्रित बांधकाम (Integrated Campus) करण्याचे प्रस्तावित आहे. हा परिसर ग्रीन कॅंपस तसेच  नेट झीरो अशा पद्धतीचा असेल. पर्यावरणपुरक इमारत बांधकाम करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here