एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या राज्याच्या उद्दिष्टाला गती मिळणार
मुंबई, दि. 28 : जीडीपीनुसार महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे राज्य आहे. देशाच्या उत्पादनात सर्वाधिक योगदान राज्य देते. 2029 पर्यंत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) सोबतची भागीदारी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यातील पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीचा वेग वाढवण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने जागतिक बँक समूहाचा सदस्य असलेल्या आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत करार केल्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि शहरी विकास यासारख्या सर्व मूलभूत पायाभूत क्षेत्रांच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात येत आहेत. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सक्षम करण्यासाठी खासगी वित्तपुरवठा उपलब्ध होण्यासाठी ‘आयएफसी’सोबतची भागिदारी उपयुक्त ठरेल. याद्वारे राज्याच्या विकासाच्या उद्दिष्टांना निश्चितच गती मिळेल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबतचे सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधीचे आम्ही स्वागत करतो. पीपीपी प्रकल्प, मालमत्तांचा सुयोग्य वापर आणि शहरांसाठी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वित्तपुरवठा करून महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि विकासाला चालना देण्याचे, महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना बळकट करणे आणि लाखो लोकांसाठी सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्याचे ध्येय असल्याचे आयएफसीचे प्रादेशिक उपाध्यक्ष (आशिया आणि पॅसिफिक) रिकार्डो पुलिटी यांनी सांगितले.
तीन प्रमुख क्षेत्रांतील सहकार्यासाठी हा करार करण्यात आला असून, त्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्पांद्वारे खासगी भांडवलाची उभारणी, मालमत्तांचा सुयोग्य वापर आणि महानगरांच्या विकासासाठी निधीची उभारणी इत्यादींचा समावेश आहे. या माध्यमातून ऊर्जा, पारेषण आणि वितरण, रस्ते, विमानतळ, शहरी वाहतूक, औद्योगिक पार्क यासारख्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल होणार आहेत. ही व्यापक भागीदारी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाला बळकटी देण्यासाठी आणि राज्यभरात दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा पोहोचण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल. आयएफसी गुंतवणूक आणि सल्लागार सेवांद्वारे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, खर्च कमी करणाऱ्या, अडथळे दूर करणाऱ्या, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणाऱ्या आणि कार्यक्षमतेत सुधारणा आणि आधुनिकीकरणाद्वारे रोजगार निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना पाठबळ देते. गेल्या 15 वर्षांमध्ये, आयएफसीने जागतिक स्तरावर विविध देशांना विविध प्रकल्पांवर सल्ला दिला आहे.
आयएफसी ही विकसनशील देशांमधील खासगी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणारी सर्वात मोठी जागतिक विकास संस्था असून जागतिक बँक समूहाचा सदस्य आहे. गरिबी निर्मूलन आणि सामायिक समृद्धी वाढविण्याचे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संस्था विकसनशील देशांमध्ये खासगी क्षेत्राच्या वाढीस प्रोत्साहन देऊन आर्थिक विकासात, लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करते. भागीदारांना आर्थिक आणि इतर आव्हानांवर मात करण्यासाठी संसाधने, तांत्रिक कौशल्य, जागतिक अनुभव आणि नाविन्यपूर्ण उपाय उपलब्ध करून देते. प्रभावी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून, इतर गुंतवणूकदारांना एकत्रित करून आणि कौशल्य सामायिक करून उद्दिष्ट साध्य करण्यात येते. याद्वारे रोजगार निर्मिती आणि जीवनमान उंचावण्यालाही मदत करण्यात येते.
00000