औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0
1

मुंबई, दि. 28 : औषध व वैद्यकीय उपकरणे खरेदीची प्रक्रिया विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्याबाबतचा बृहत आराखडा निश्चित करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या खरेदी कक्षामार्फत करण्यात येणाऱ्या औषध व वैद्यकीय उपकरणे खरेदीबाबत आढावा बैठक झाली. खरेदी कक्षाकडून करण्यात येणारी खरेदी कार्यपद्धत तसेच खरेदी कक्षाकडे खरेदीच्या अनुषंगाने प्रलंबित असलेली प्रकरणे व त्यामागची कारणे तसेच खरेदी कक्षाला निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध स्तरावर येणाऱ्या अडचणी मंत्री श्री. राठोड यांनी जाणून घेतल्या.

हाफकीनमार्फत करण्यात येणारी खरेदी ही पारदर्शी व तातडीने होण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.  संचालक हाफकीन, सचिव, अन्न व औषध प्रशासन यांनी दाखल होणाऱ्या खरेदी प्रकरणावर प्राथमिक तपासणी करून, प्रशासकीय मान्यता, निधी वर्ग झाल्याबाबत खात्री करावी. बऱ्याच वेळेस पुरवठा कोणत्या रुग्णालयात करावा याबाबत यादी न आल्यामुळे खरेदी प्रलंबित राहते, असे निदर्शनास आल्यामुळे अशी प्रकरणे सर्व बाबींची पूर्तता झाल्यावरच दाखल करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. संचालक हाफकीन यांनी तांत्रिक निविदा सल्लागार समितीच्या अध्यक्ष या नात्याने उच्च दर्जाची औषधे व उपकरणे मिळण्यासाठी पुरवठादार यांच्या उपकरणाची प्रत्यक्ष वापरात असलेली कार्यक्षमता, तसेच तक्रारीबाबत असलेले अभिलेख विचारात घेऊन कार्यवाही करावी. काही मोठ्या कंपन्या निविदेत भाग घेत नाहीत. तथापि, अशा उत्पादकांना प्राधिकृत केलेल्या पुरवठादारास मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर परवानगी देण्याचे निर्देश सचिवांना दिले.

हाफकीनकडे परिपूर्ण प्रस्तावावर 3 महिन्यात अंतिम कार्यवाही करावी. तसेच अपूर्ण प्रकरणे संबंधित विभागास परत करण्याचे निर्देश यावेळी मंत्री श्री. राठोड यांनी दिले.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here