निरोगी आहारासाठी पौष्टिक तृणधान्यांचा वापर

0
27

महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर राज्यांत पूर्वीपासून विविध प्रांतात अन्नधान्याची विविधता आढळून येते.  सकस आहारावर पूर्वीच्या काळी जास्त भर दिला जायचा. हळूहळू ही पद्धत बदलत गेली आणि जंक फूड किंवा फास्ट फूडचे अधिक प्रमाणात सेवन वाढले. रोजची धावपळ, कामाचे व्यवस्थापन यामध्ये नाईलाज म्हणून यावर भर दिला जाऊ लागला. त्यातून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळाले. त्यामुळेच आता पुन्हा पूर्वापार चालत आलेल्या काही पद्धती आपण अंगीकारत असल्याचे दिसते आहे. शरीराला पौष्टिक मानल्या गेलेल्या तृणधान्याचा वाढता वापर हे त्याचेच द्योतक आहे. हे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष आनंदाची बाब ही की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे.

आपला देश हा जगातील सर्वात मोठा पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादक देश आहे. या पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्याबद्दल जागरुकता वाढविणे आणि  तृणधान्य उत्पादन अधिकाधिक वाढविणे यासाठी प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. राज्यात त्यादृष्टीनेच ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’चा प्रारंभ करून ‘श्री अन्न अभियान’ सुरू केले आहे. त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. भरड धान्याच्या उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रात्यक्षिक, यांत्रिकीकरण करणे, प्रक्रिया करणे, मूल्यसाखळी विकास याचा यामध्ये समावेश आहे.

शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन घेणे आणि दैनंदिन आहारात सर्वांनी त्याचा वापर करणे गरजेचे आहे. तरच हा केवळ या एका वर्षापुरता उपक्रम न राहता लोकचळवळ बनेल. सध्या  राज्याच्या विविध भागांत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या पौष्टिक तृणधान्याचे महत्व पटवून दिले जात आहे.

आपल्याकडे परंपरेनुसार आहारात अनेक प्रकारचे धान्य वापरतात. यामध्ये गहू, तांदुळ या रोजच्या धान्याबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कोडो, कुटकी अशा तृणधान्यांचा देखील समावेश होतो. या तृणधान्यांमुळे आहारात विविधता राखली जाते. पौष्टिक तृणधान्यांचा उपयोग आपल्या रोजच्या ऊर्जेच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक आहे. आपला आहार हा कर्बौदिके, प्रथिने, जीवनसत्वांनी समृद्ध हवा, ही गरज तृणधान्य भागवतात.

या पीकांचे उत्पादन हे प्रामुख्याने कोरडवाहू भागात होते. या शेतकऱ्यांची पीक पद्धती टिकून राहावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित बियाणे आणि अवजारे यांचा विविध योजनांद्वारे पुरवठा करुन उत्पादकता वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासंदर्भात कृषीमंत्री अब्दुल सत्तार नियमितपणे आढावा घेत असतात.

महाराष्ट्रात नगदी पीक घेण्याचा कल जास्त आहे. पीक पद्धतीचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, तृणधान्यांचे उत्पादन इतर धान्यांच्या तुलनेत कमी वाढलेले आहे. या धान्यांत सूक्ष्म आणि स्थूल पोषकतत्त्वे असल्यामुळे सर्वच वयोगटांतील व्यक्तिंसाठी या धान्यांचा आहारात समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, आपल्या राज्यासोबतच देशाच्या इतर भागांतही पौष्टिक तृणधान्यांचा प्रति व्यक्ति वापर दर वर्षी कमी कमी होत चालल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्याची मागणी यामध्ये होणारी तफावत, पौष्टिक तृणधान्यांच्या जास्त वापराने काही प्रमाणात भरुन काढता येऊ शकते. कारण पौष्टिक तृणधान्य इतर धान्यांच्या तुलनेत स्वस्त असतात तसेच पौष्ट‍िकतेच्या दृष्टीने देखील समृद्ध असतात, हे विशेष!

पौष्टिक तृणधान्य ही पर्यावरणास अनुकूल आहेत. या पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे धान्य उत्पादन वाढविण्यास मदत होते. शिवाय शेतीतील जैवविविधता आणि टिकाव वाढविणारी मिश्र पीक प्रणाली करणे आवश्यक असते. या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढून पीके अधिक मजबूत होतात, आणि शेतीची उत्पादकताही वाढते. आपल्या राज्याच्या कोरडवाहू भागात अनेक शेतकरी अशा पीकपद्धतीचा अवलंब करताना आपण पाहतो.

सन 1991 ते 2000 या दशकात खरीप हंगामात सोयाबीन, तूर व ऊस पिकांमध्ये तर रबी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पौष्टिक तृणधान्य पिकांखालील क्षेत्रात मोठी घट होण्यास सुरुवात झाली. सन 2010-11 ते 2020-21 कालावधीत पौष्टिक तृणधान्य पिकाचे क्षेत्र 57 टक्के, उत्पादन 52 टक्के घटले आहे. तथापि उत्पादकतेत 12 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.

खरिप ज्वारी पिकाचे क्षेत्र 80 टक्के, उत्पादन 87 टक्के तर उत्पादकतेत 37 टक्के घट झालेली आहे. रब्बी ज्वारी पिकाचे क्षेत्र 53 टक्के, उत्पादन 27 टक्के घटले आहे, तथापि उत्पादकतेत 55 टक्के वाढ दिसून येते. बाजरी पिकाचे क्षेत्र 51 टक्के, उत्पादन 59 टक्के तर उत्पादकतेत 17 टक्के घट झालेली आहे.  नाचणी पिकाखालील क्षेत्र 39 टक्के, उत्पादन 21 टक्के घटले आहे, तथापी उत्पादकतेत 29 टक्के वाढ दिसून येते. पौष्टिक तृणधान्य पिकांखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली तरी पिकांच्या सुधारित व संकरीत वाणांचा प्रसार तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे उत्पादकतेत झालेल्या वाढीमुळे उत्पादनात तेवढ्या प्रमाणात घट जाणवली नाही.

पौष्टिक तृणधान्य पिकांखालील क्षेत्र विस्ताराद्वारे क्षेत्र व उत्पादकता वाढविणे, नवीन वाणांच्या बियाणे/वाण बदलाच्या दरात वृद्धी करणे. सन 2018-19 पासून केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्ट‍िक तृणधान्य (न्युट्री सिरीयल) अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी राज्यात 31 जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पिक प्रात्यक्षिके, सुधारित वाणांचे बियाणे वितरण, सुधारित बियाणे उत्पादन, एकात्मिक अन्नद्रव्ये व कीड व्यवस्थापन व कृषि यांत्रिकीकरण या बाबींचा समावेश आहे.

तृणधान्यांमधील पोषणमूल्यांमुळे त्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांची गणना पौष्टिक तृणधान्य अर्थात ‘श्री अन्न’ अशी करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई व इतर लघु तृणधान्ये (कोडो, सावन, कुटकी, राळा) ही पिके मोडतात. या पिकांच्या उत्पादनात वाढ करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राज्याचा कृषी विभाग राबवित आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तृणधान्य उत्पादनाला चालना देणे, आपल्या या पारंपरिक अन्नाकडे अधिकाधिक नागरिकांना पुन्हा वळविणे यासाठी सातत्याने प्रयत्न राज्य शासनामार्फत केले जात आहेत. समाजातील विविध घटकांचा सहभाग यामधे घेतला जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही कृषी विभाग, आत्मा, ग्रामविकास यासह विविध विभागांच्या सहकार्याने या अभियानाला गती दिली जात आहे.

सर्वसाधारणपणे पौष्टिक तृणधान्ये ही ग्लुटेन फ्री असून त्यांचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी आहे. या पिकात मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ (Fibers), विविध खनिजे (Minerals), आवश्यक जीवनसत्वे (Vitamins) व समतोल प्रथिने (Protins) आहेत. पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन इ. सारख्या सूक्ष्म पोषक घटकाने समृद्ध असल्याने पौष्टिक तृणधान्ये ही विविध आजारांवर गुणकारी असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, ही बाब अधिक महत्त्वाची आहे.

राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वृद्धी करणे व या पिकांचे आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढविण्याकरिता प्रचार-प्रसिद्धी करणे हे उद्देश आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांचा यामध्ये समावेश आहे. कृषी विभागासोबतच शालेय व उच्च शिक्षण, महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास, ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, माहिती व जनसंपर्क यांच्याबरोबरच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये, हॉटेल असोसिएशन, शेफ असोसिएशन, वैद्यक संघटना, राज्यातील सर्व महानगरपालिका, सामाजिक संस्था व प्रक्रीयाधारक यांचे सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात

येत आहे,

राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हास्तरीय कृषी महोत्सव,  मिलेट दौड (रन / वॉक फॉर मिलेट), पाककला स्पर्धा, आहारतज्ज्ञांची व्याख्याने, मिलेट ऑफ दि मंथ म्हणजेच “महिन्याचे तृणधान्य” संकल्पना राबविणे, महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग्स, बिलबोर्डस, बॅनर्स इ. द्वारे प्रचार प्रसिद्धी, मध्यान्ह भोजन आहार इ. मध्ये पौष्ट‍िक तृणधान्याचा समावेश करणे, शेफ असोशिएशनच्या माध्यमातून पाककृती तयार करणे, प्रचार-प्रसार करणे,  विद्यार्थ्यामध्ये आरोग्य व आहारविषयक जागरुकता निर्माण करणे या उपक्रमांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.

लोकांच्या आहारात पौष्टिक तृणधान्यांचा जास्तीत जास्त वापर वाढावा, त्यांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक व्हावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही त्यामुळे भर पडेल.

 

दीपक चव्हाण

विभागीय संपर्क अधिकारी

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here