शेतीला पशुपालनाची जोड दिली, दुध आणि शेणखतामुळे आली आर्थिक समृद्धी

0
6

शेतीच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेताना परिश्रमाची जोड असल्यास शेतकऱ्यांच्या घरी आर्थिक समृद्धी हमखास येतेच. वाघझाडी येथील नितीन भास्कर इंगळे यांनी शासनाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेचा लाभ घेत पारंपरिक शेतीला पशुपालनाची जोड देत आर्थिक समृद्धी साध्य केली आहे.

बार्शी टाकळी तालुक्यातील वाघझाडी हे गाव. या गावातील नितीन भास्कर इंगळे हे शेतकरी. आधीच खारपाणपट्टा असल्याने संपूर्ण कोरडवाहू क्षेत्र. अकोला जिल्ह्याचे उष्ण व प्रतिकूल हवामान.   अशा परिस्थितीत इंगळे कुटुंब आपल्या पारंपारिक शेतीत कापूस, सोयाबीन हे पिक  घेत गुजराण करीत होते.  मात्र हवे तसे उत्पन्न होत नव्हते. जेमतेम पावणे दोन लाखांपर्यंत उत्पन्न जाई.

अखेर इंगळे यांनी  शासनाच्या नाविन्यपुर्ण योजनेतून पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरे वाटप योजनेचा लाभ घेतला. त्यांना त्यातून दोन म्हशी मिळाल्या. या म्हशी पालनात त्यांना रुची निर्माण झाली. दुधाचे उत्पन्न अधिक शेणखताचे उत्पन्न. हेच शेणखत स्वतःच्या शेतात ते टाकत गेले. पावणे दोन लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या शेतातून त्यांना आता चार लाख रुपयांचे पिक होऊ लागले.

आर्थिक सुधारत गेल्याने आज त्यांच्याकडे आठ म्हशी आणि सहा संकरीत वगारी आहेत. आता त्यांना शेणखतातूनच आर्थिक उत्पन्न होऊ लागले आहे. या शिवाय दुधाचे उत्पन्न आहेच. त्यातुन सर्व घरखर्च भागत असतो. आता त्यांच्या शेताचा खर्च, जनावरांचा खर्च सर्व भागून निव्वळ नफा मिळू लागला आहे. शिवाय आठ लाख रुपये किमतीचे पशुधन गोठ्यात आहेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here