पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची वैद्यकीय महाविद्यालयास भेट; चांगले डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचे आवाहन

0
8

नंदुरबार,दिनांक.2 एप्रिल,2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान भावी डॉक्टरांना चांगले डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे हे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी  २०१२ पासून प्रयत्न केले ते स्वप्न आज पूर्ण झाले असून नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून या भागातील बहुतांश रूग्णांमध्ये सिकलसेल, कुपोषण व रक्त संबंधित तसेच विविध दुर्धर आजाराचे रुग्ण आपणास दिसून येतील. त्यामुळे या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा देत असताना आपणास वैद्यकीय संशोधनाचा अनुभव मिळेल व आपल्या वैद्यकीय ज्ञानात अधिक भर पडून आपण चांगले डॉक्टर व्हा व रुग्णसेवा करा,असे आवाहन  त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.  जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने  विद्यार्थ्यांचाही पालक असून विद्यार्थ्यांच्या व संस्थेच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारीही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांनी एमबीबीएस परीक्षेचा 100 टक्के निकाल लागल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळालेले विद्यार्थी मोहम्मद शेख, भक्तिसिंग व अनुजका तडकसे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राध्यापक शल्यचिकित्साशास्त्र डॉ. तुषार पाटील यांना रुग्णालयीन प्रशासनाच्या कामासाठी उपअधिष्ठाता तर सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश बोरसे यांना बधिरीकरणशास्त्र वैद्यकीय अधिकृषक म्हणून नियुक्ती दिल्यामुळे त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक डॉ तुषार पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रविणकुमार ठाकरे, डॉ. योगेश बोरसे, डॉ.संतोष पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमाले किनगे, डॉ. सुधाकर बंटेवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थी हर्षल केदारे यांनी केले. प्रारंभी त्यांनी महिला रुग्णालय तसेच आयुष रुग्णालयातील द्वितीय वर्षाच्या प्रयोगशाळा विभागाची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here