मुंबई, दि. 4 : जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी आज येथे सांगितले.
यापूर्वी चेन्नई येथे वाणिज्यदूत म्हणून काम केलेल्या एकिम फॅबिग यांची जर्मनीच्या मुंबईतील वाणिज्यदूत पदी नियुक्ती झाली असून सोमवारी (दि. ३) त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
जर्मनीला नर्सेस, इलेक्ट्रिशिअन, आदरातिथ्य क्षेत्र व्यावसायिक, सोलर युटिलिटी तंत्रज्ञ आदींची तातडीने आवश्यकता असून आपल्या मुंबईतील कार्यकाळात जर्मनीची कौशल्याची गरज व भारताकडील मनुष्यबळाची उपलब्धता याची सांगड घालण्यावर आपला भर असेल असे फॅबिग यांनी सांगितले.
जर्मनीच्या ८०० कंपन्या आज भारतात काम करत असून त्यापैकी किमान ३०० कंपन्या पुणे येथे असून जर्मनीतून येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीतील महाराष्ट्रात काम करीत असलेल्या कंपन्या समाधानी असल्याचे फॅबिग यांनी सांगितले. जर्मनीने मुंबई तसेच नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष युरो गुंतवणूक केली आहे.
आज ३५००० भारतीय विद्यार्थी जर्मनी मध्ये शिकत असून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची मोठी संख्या आहे. एकट्या बर्लिनमध्ये १७००० भारतीय आयटी तंत्रज्ञ राहत आहेत. यावर्षी जर्मनीला २०० नर्सेसची आवश्यकता असून त्या दृष्टीने केरळ येथील एका नर्सिंग कॉलेजशी करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताशी आर्थिक व राजकीय संबंध वृद्धिंगत करण्याशिवाय जर्मनी भारतीयांसाठी प्रवास सुलभीकरण, सांस्कृतिक सहकार्य व विशेषतः चित्रपट सृष्टीशी सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
जर्मनीचा मुंबईतील व्हिजा सेक्शन जगातील तिसरा मोठा असून लवकरच तो जगातील सर्वात मोठा व्हिजा सेक्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बायर्न म्युनिक फुटबॉलचा प्रचार प्रसार करणार
भारतात फुटबॉल प्रचलित करण्यासाठी जर्मनीचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक देशाच्या ग्रामीण भागात फुटबॉल प्रशिक्षण शिबिरे व स्पर्धांचे आयोजन करणार असून जर्मनी येथील विविध विद्यापीठांमध्ये संस्कृत शिवाय मराठी, तामिळ भाषा शिकविणारे विभाग देखील असल्याचे त्यांनी सांगितले.
जर्मनीच्या वाणिज्यदूतांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपालांनी दोन देशांच्या विश्वासाच्या संबंधांना उजाळा दिला. शाळेत शिकत असताना आपल्या शाईच्या पेनाची निब ‘मेड इन जर्मनी‘ असायची अशी आठवण सांगून जर्मनीची सध्याची कौशल्याची गरज पुरविण्यासाठी महाराष्ट्र निश्चितच मदत करेल, असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्रात नव्यानेच राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले असून जर्मनीने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात सहकार्य केल्यास त्यांची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल, असे राज्यपालांनी सांगितले.