मुंबई, दि. 4 : सध्या रशिया – युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरु आहे. अनेक देश आर्थिक अरिष्टांना सामोरे जात आहेत. शेजारच्या देशांमध्ये महागाई वाढली आहे. लोकांना अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. अशावेळी भारताने भगवान महावीरांनी सांगितलेला करुणा भाव पुन्हा जागवावा. तसेच महावीरांची अहिंसा, अपरिग्रह व अनेकांताची शिकवण आचरणात आणावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे जैन समाजातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
भारत जैन महामंडळ या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, जैन आचार्य डॉ. प्रमाण सागर महाराज, राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज, आचार्य नय पद्मसागर, डॉ. अभिजित कुमार, मुनी जागृतकुमार, भारत जैन महामंडळाचे अध्यक्ष चिमणलाल डांगी तसेच जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.
महात्मा गांधींच्या जीवनावर भगवान महावीरांसह अनेक जैन संतांच्या विचारांचा प्रभाव होता. महात्मा गांधींकडून प्रेरणा घेतलेल्या खान अब्दुल गफार खान, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला, दलाई लामा, डेस्मंड टुटू या नेत्यांवर देखील सत्य व अहिंसा या जैन तत्वज्ञानाच्या शिकवणीचा प्रभाव होता, असे राज्यपालांनी सांगितले.
झारखंड येथे जैन लोकांचे पवित्र तीर्थस्थळ असलेले श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास त्या ठिकाणचे पावित्र्य जपले जाणार नाही. यास्तव ते ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा आदेश रद्द करण्यासाठी आपण स्वतः झारखंडचे राज्यपाल असताना प्रयत्न केले, अशी माहिती राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी दिली.
कोरोना काळामध्ये जैन समाजाने मानवता व करुणेचे दर्शन घडवले. तसेच गोरगरिबांना अन्न व पाण्याची व्यवस्था उपलब्ध केली, याबद्दल राज्यपालांनी जैन समाजाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
जलसंसाधन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी जैन आचार्य राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज व आचार्य नयपद्मसागर महाराज यांनी मार्गदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी जैन आचार्य डॉ. प्रमाणसागर महाराज यांच्या ‘भगवान महावीर का आर्थिक चिंतन‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.