महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान; प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’, तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित

0
7

नवी दिल्ली, दि. 5 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 55 मान्यवरांना आज ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने, तर अन्य चार मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्मपुरस्कार प्रदान सोहळा झाला. या कार्यक्रमास  उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आदी उपस्थित होते.

प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ तर गजानन माने, परशुराम खुणे, रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा. धर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. धर हे सांख्यिकीय भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांना विज्ञानातील प्रतिष्ठेचा जागतिकस्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार (Boltzmann Medal) घोषित झाला आहे.

राज्यातील 4 मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान

गजानन माने यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने  गौरविण्यात आले. श्री. माने यांनी कुष्ठ रोग्यांसाठी आपले जीवन समर्पित केले.

परशुराम खुणे यांनी नक्षल प्रभावित भागात लोककलेच्या माध्यमातून पुनर्वास आणि सामाजिक  कुप्रथांविषयी लोक जागृती केली.

अभिनेत्री रविना टंडन या 25 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करीत असून अनेक चित्रपटांमंधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.

कला क्षेत्रातील कुमी वाडीया कोरल संगीत ‘कंडक्ट’( संचलन) करणाऱ्या प्रथम भारतीय महिला आहेत. त्यांनी आजवर देश विदेशात विविध कार्यक्रम सादर केलेले आहेत.

एकूण 55 पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. 3 मान्यवरांचा पद्मविभूषण, 5 मान्यवरांचा पद्मभूषण आणि 47 मान्यवरांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here