नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
7

सांगली, दि. ११, (जि. मा. का.) : जत तालुक्यातील डफळापूर येथील शेतकरी  रेखा सुनिल परीट यांच्या अवकाळी पावसामुळे कोसळलेल्या द्राक्ष बागेची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‍विषय मांडून शेतकऱ्यांना नुकसानीबाबत मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, प्रकल्प संचालक आत्मा जी. घोडके, उपविभागीय कृषी अधिकारी जत मनोजकुमार वेताळ, तहसीलदार जीवन बनसोडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात 20 गावातील 92 शेतकऱ्यांचे 34.85 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष, आंबा, केळी, भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती घेवून मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत ‍मिळवून देण्यसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी ‍दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलण्याबाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी तहसिलदार व कृषि अधिकारी यांना सूचना दिल्या.

अवकाळी पावसामुळे ७  एप्रिल रोजी डफळापूर गावच्या शेतकरी रेखा परीट यांच्या 17 गुंठे द्राक्ष बागेचे पूर्ण नुकसान होवून विक्री योग्य तयार झालेली द्राक्षबाग पूर्णपणे कोसळली. कृषि पदवीधर मुलाने मोठ्या कष्टाने उभी केलेली द्राक्षबाग वादळवाऱ्यात नष्ट झाली. 30 रूपये किलोने द्राक्षबागेचा विक्रीसाठी सौदाही झाला होता. मुलाच्या कष्टावर निसर्गाने पाणी फिरवले या शब्दात रेखा परीट यांनी आपले दु:ख पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासमोर व्यक्त केले.

संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here