जलजीवन मिशनमध्ये पाड्यांचा समावेश होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करा- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
9

नंदुरबार : दिनांक 13 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा) जलजीवन मिशनच्या माध्यामातून गावे, घरांसाठी शाश्वत स्वरूपाची पाणी योजना निर्माण होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एकही पाडा, गाव, घर वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील जलजीवन मिशन आणि घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन संदर्भात आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते.  या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत उगले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

काटेकोर सर्वेक्षण करण्यात यावे

 यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले, जलजीवन मिशन आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहता कामा नये. तसेच लोकांच्या तक्रारी कमी होण्यासाठी 15 दिवसाच्या आत ग्रामसभेतून सर्वेक्षणाचे पुनर्विलोकन करून सर्वेक्षण अधिक काटेकोर करून घ्यावे. यात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करावी.  धडगाव, अक्कलकुवा, शहादा या तालुक्यातून त्रुटींबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा करून सर्वसमावेशक गावांचा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात यावा.

100 टक्के घरांचा समावेश करावा

जलजीवन मिशनच्या माध्यमातून गाव, पाडा, मनुष्यनिहाय नियोजन करण्याची ही आगळी-वेगळी योजना असून येणाऱ्या 30 वर्षांसाठी पेयजलाची ही शाश्वत स्वरूपाची योजना आहे. त्यामुळे गावातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे. त्यामुळे लोकांना वेळेत पेयजल मिळण्यासाठी वेळेत योजना पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here