महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तयारीचा मंत्री शंभूराज देसाई व रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा

0
10
ठाणे, दि. १४ (जिमाका) : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आढावा घेतला. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी आणि उपस्थित नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे कामे करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.
खारघर येथील कार्यक्रम स्थळी झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बनविलेल्या 30 हुन अधिक समित्यांना सोपविलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्वच्छता गृहे, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ व्यवस्था, परिवहन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
कार्यक्रमाला आलेले नागरिक व कार्यक्रम संपल्यानंतर जाणारे नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आदींची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच नागरिक या ठिकाणी जमणार आहेत. त्यामुळे या नागरिकांना काहीही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणांनी नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात. कामाच्या नियोजनाप्रमाणे आराखड्याची अंमलबजावणी करावी व दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
कार्यक्रम शांततेत व नियोजित पद्धतीने पार पडेल याची सर्वांनीच दक्षता घेण्याच्या सूचना श्री. शंभूराज देसाई यांनी यावेळी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here