नाईक व लेंडी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन

नागपूर,  14 : केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरातील नाईक व लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यक्रमाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. येत्या काळात या दोन्ही तलावांमध्ये स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होईल व या परिसराच्या विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

      केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विलास कुंभारे, कृष्णा खोपडे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी मंचावर उपस्थित होते.

यावेळी संबोधित करतांना उपमुख्यमंत्री म्हणाले, या दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाच्या भूमीपूजनाचा ऐतिहासिक क्षण आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील गतवैभव असणाऱ्या या तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण होईल. या भागातील जनतेचे जीवन सुखकर होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘अमृत सरोवर योजना’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 तलावांचे पुनरुज्जीवन आणि निर्मिती करण्याचे ध्येय आहे. ‘अटल अमृत योजने’च्या माध्यमातून तलावांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन अभियान हाती घेण्यात आले आहे. नागपुरातही तलावांच्या संवर्धनासाठी काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अंबाझरी, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर तलावांचे कार्य सुरू झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. या टप्प्यात नाईक व लेंडी तलावांचे पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. अमृत योजनेअंतर्गत केंद्राकडे या दोन्ही तलावांच्या संवर्धनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. राज्य सरकारनेही यास मंजुरी दिली आणि महानगरपालिकेने हे काम हाती घेतले आहे. आता या दोन्ही तलावांचा कायापालट होणार असून स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे या भागातील  जनतेचे जीवन सुखकर होईल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना श्री. गडकरी यांनी या दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाची योग्य प्रकारे काळजी घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले. वस्त्या मोठ्या होत आहेत. त्यामुळे सर्व सुविधा या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे अनेक सुविधा दिल्या जाऊ शकत नाही. नवीन रस्ते तयार होताना काही ठिकाणी काही घरे पाडावी लागतील. त्यांना योग्य प्रकारे मोबदला दिला जाईल. घरापर्यंत ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, वैद्यकीय सुविधा, पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अशा मोठ्या प्रकल्पांना गती देताना प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

      येत्याकाळात नागपुरच्या प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंट रस्ते होतील. एकही साधा रस्ता नागपुरमध्ये राहणार नाही. पुढील सहा महिन्यात नागपुरला 24 तास पाणीपुरवठा पूर्ण शहरभर दिला जाईल. उत्तर नागपूर मध्ये 1 हजार कोटीच्या खर्चातून उड्डाणपूल होत आहे. त्यामुळे गर्दीच्या वस्तीतील वाहतूक कोंडी पासून नागरिकांची सुटका होईल. मात्र यासाठी नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

      दोन्ही तलावांमध्ये यापुढे घाण पाणी जाणार नाही. आजुबाजुला अतिक्रमण होणार नाही. कोणाला अतिक्रमण करू देणार नाही यासाठी या वस्तीमधील नागरिकांनीच पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     तत्पूर्वी, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थितांना संबोधित केले. या भागातील समस्या, मागण्या याची मांडणी दोन्ही नेत्यांपुढे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

            या कार्यक्रमात श्री. फडणवीस आणि श्री. गडकरी यांच्या हस्ते चार लाभार्थ्यांना प्रातिनिधीकरित्या आयुष्मान कार्डचे आभासी पद्धतीने वितरण करण्यात आले.