विदर्भ, मराठवाड्यातील दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मिळणार गती – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
7

नवी दिल्ली दि. १८ : विदर्भ आणि मराठवाडा विभागातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती मिळणार असल्याची माहिती, राज्याचे महसूल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.

दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भात तसेच पशुसंवर्धन विषयाशी निगडीत आज महत्वपूर्ण बैठक झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्यासह केंद्र सरकारचे आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर श्री. विखे पाटील यांनी सांगितले, दुग्धविकास आणि पशु संवर्धन संदर्भात पहिला टप्पा पुर्ण झालेला असून दुसऱ्या टप्प्याची सुरूवात करण्यासंदर्भात आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीत  प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या अडचणी केंद्र सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करू, असे सकारात्मक आश्वासन दिले असून दुसऱ्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. विखे पाटील दिली.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले,  विदर्भ आणि मराठवाडा विभागात दुग्धविकास प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश होता, आता यामध्ये गडचिरोली या जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रथम टप्प्याच्या सुरूवातीला शेतकऱ्यांकडून प्रतिदिन  170 लीटर दुध मदर डेयरी घेत असे आता प्रतिदिन 3 लाख लीटरपर्यंत क्षमतेत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्यात 11 हजार जनावरांचे वाटप करण्यात येणार  असून  20 हजार मेट्रीक टन प्रजननक्षम पशुखाद्य देण्यात येणार असल्याचेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.  यासह 12 हजार एकर क्षेत्रात पशु खाद्याची लागवड करण्यात येणार आहे. सोबतच 10 हजार कडबा कुट्टी यंत्र लावण्यात येतील. 1 लाख 62 हजार वांझ जनावरांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तर,  10 लाख कृत्रिम रेतन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाकडून  11 हजार बायोगॅसचे युनिट वाटप केले जाईल. प्रत्येका जिल्ह्यात मोबाईल वेटरनरी युनिट सुरू करण्यात येणार असल्याची   माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिली.

00000

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 70 /दि.18.4.23

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here