धुळे, दि. १८ : – धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.
साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला असून एक महिला गंभीररित्या भाजल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत तर जखमींवरील उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
पालकमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
या घटनेची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे दूरध्वनीवरून सांत्वन करून घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.