रेल्वे यार्डमधील माथाडी कामगारांना मुलभूत सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात – कामगार मंत्री सुरेश खाडे

0
2

मुंबई, दि. २० : विविध रेल्वे यार्डमध्ये माथाडी बोर्डात नोंदणी असलेले कामगार मालाची चढ-उतार करतात, या कामगारांना पाणी, शेड, शौचालय, सुसज्ज विश्रांतीगृह, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विविध रेल्वे यार्डामध्ये या सुविधा देण्यासंदर्भात तातडीने क्रियाशील आराखडा सादर करावा. माथाडी कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने वितरीत करण्याच्या सूचना कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केल्या.

रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनातील अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसोबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना देताना मंत्री श्री. खाडे बोलत होते. या बैठकीत कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अधिकारी पोपटराव देशमुख यांच्यासह अन्य ११ माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. खाडे म्हणाले की, विविध ११ कामगार व माथाडी संघटनांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. सर्व रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी अंतर्गत रस्ते व धक्क्यासाठी येणारा रोड सुस्थ‍ितीत तयार करून देणे. कामगारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुसज्ज शौचालय, धक्क्यावर कायमस्वरूपी शेड, विद्युत सेवा, विश्रांतीगृह, जुन्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे. तसेच, माल उतरवताना रेल्वे आणि प्लॅटफॉर्म मध्ये अंतर फार असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे, यावर पर्याय म्हणून लोखंडाच्या पायरीचा वापर करण्यात यावा. संबंधीत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने तातडीने आराखडा तयार करून सादर करावा, असे मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी सांगितले.

मानवतेच्या दृष्टीकोनातून माथाडी कामगारांचा विचार करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. त्यांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सुचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here