माढा तालुक्यातील वडाची वाडी आऊ जिल्ह्यातील सुंदर गाव-  पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

0
9

सोलापूर, दि. २४ (जि. मा. का.) : आज २४ एप्रिल ‘राष्ट्रीय पंचायत राज दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यातील आर. आर. (आबा) पाटील जिल्हा व तालुका सुंदर गावांची घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज केली.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित एका बैठकीत वडाची वाडी आऊ (ता. माढा) या जिल्हा सुंदर गावासह ११ तालुका सुंदर गावांची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केली. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांचे अभिनंदन करून अधिक चांगल्या कामांसाठी शुभेच्छा दिल्या. याचे बक्षीसवितरण स्वतंत्र कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.

जिल्हा सुंदर गावासाठी रक्कम रू. ४० लाखाचे बक्षीस आहे. तर तालुका सुंदर गावासाठी रक्कम रू. १० लाखाचे बक्षीस आहे. ११ तालुका सुंदर गाव ग्रामपंचायतीचे नाव व तालुका पुढीलप्रमाणे – वागदरी (ता. अक्कलकोट), अंबाबाईची वाडी ( ता. बार्शी), खडकी  (ता. करमाळा), वडाचीवाडी आऊ (ता. माढा), पुरंदावडे (ता. माळशिरस), लमाणतांडा (बालाजी नगर) (ता. मंगळवेढा), आष्टी (ता. मोहोळ), कौठाळी (ता. उत्तर सोलापूर), तिसंगी (ता. पंढरपूर), वाकी शिवणे (ता. सांगोला), दिंडूर (ता. दक्षिण सोलापूर)

दरम्यान राष्ट्रीय पंचायत पुरस्कार या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी राज्यातून जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतींना नामांकन देण्यात आले आहे. यामध्ये सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव म्हणून अंकलगे (ता. अक्कलकोट), बालस्नेही गाव म्हणून अर्धनारी (ता. मोहोळ), सुशासनयुक्त गाव म्हणून भोसे (ता. पंढरपूर) आणि स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेले गाव म्हणून यशवंतनगर (ता. माळशिरस) या गावांना नामांकन देण्यात आल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ६७ गावांची निवड करण्यात आली आहे.

सुशासन, आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामपंचायत सौंदर्यीकरण या मुद्द्यांवर सदर गावांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी सांगितले.

00000

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here