डाळिंब क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील- अप्पर मुख्य सचिव (सहकार) अनुप कुमार

0
4

सोलापूर दि. 24 (जि. मा. का) : सोलापूर जिल्हा हा डाळिंब पिकाचे आगार असणारा जिल्हा आहे. भारतातून डाळिंब निर्यातीत या जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. परंतु काही वर्षापासून प्रतिकूल नैसर्गिक बदलांमुळे, रोग व कीड प्रादुर्भावामुळे, तसेच निश्चित भाव नसल्याने डाळिंब लागवड कमी झाली आहे. या अनुषंगाने डाळिंब पीक उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यासाठी डाळिंब पीक धोरण कार्यशाळा उपयोगी ठरेल. डाळिंबाचे कमी झालेले क्षेत्र वाढविण्यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राज्याचे सहकार व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा मॅग्नेट सोसायटीचे अध्यक्ष अनुप कुमार यांनी व्यक्त केला.

डाळिंब पिकाची लागवड वाढण्यासाठी महाराष्ट्र ॲग्रीबिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या क्षमता विकास घटकांतर्गत आयोजित डाळिंब पीक धोरण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास मॅग्नेट प्रकल्पाचे अतिरीक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, विभागीय प्रकल्प उपसंचालक राजेंद्र महाजन, प्रकल्प उपसंचालक नितीन पाटील, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व फार्म डी एस एस ॲग्रोटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे संचालक राजीव मराठे यांनी डाळिंब लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याची कारणे व लागवडीचे क्षेत्र वाढण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये फार्म डी एस एस अॅग्रीटेक प्रा. लि. चे संस्थापक डाळिंबरत्न बी. टी. गोरे यांनी उत्तम कृषि पध्दती वापरून डाळिंबाच्या शेती आधुनिक कशी करता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जोत्स्ना शर्मा यांनी डाळिंब पीक संरक्षण, डाळिंबावरील विविध रोग व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश गायकवाड  यांनी काढणीपश्चात व्यवस्थापन व डाळिंबाचे मूल्यवर्धन करण्यासाठी फळ प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. पंढरपूर भागातील निर्यातदार अमरजीत जगताप यांनी विपणन व निर्यात कशी करावी, तसेच निर्यात करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. तांत्रिक मार्गदर्शनानंतर शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी केले. या कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते डाळिंब माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध भागातून ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तसेच महिला डाळिंब उत्पादकांनी उपस्थिती दर्शविली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here