‘एकम फेस्ट’ प्रदर्शनात सहभागी झालेल्या दिव्यांग उद्योजकांना उत्तम प्रतिसाद

0
13

 

नवी दिल्ली, 6 :  केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने राजधानीत आयोजित दिव्यांग उद्योजकांच्या ‘एकम फेस्ट’ प्रदर्शनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील उद्योजकांना दिल्लीकर तसेच देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.         

मुंबईच्या चारुशिला जैन-मुरकर, अहमदनगरचे गणेश हनवते आणि दिनकर गरुडे या दिव्यांग उद्योजकांनी कलाकुसरीच्या वस्तू या प्रदर्शनात मांडल्या आहेत व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळाने(एनएचएफडीसी) येथील बाबा खडक सिंह मार्गवर स्थित ‘स्टेट एम्पोरिया कॉम्प्लेक्स’ भागात ‘एकम फेस्ट’ चे आयोजन केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी आणि महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते  2 मार्च 2020 ला या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. देशभरातील 17 राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 44 पुरूष व 38 महिला  अशा एकूण 82 दिव्यांग उद्योजकांनी यात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातून एक महिला व दोन पुरुष दिव्यांग उद्योजक यात सहभागी झाले आहेत. 

या प्रर्शनीत 57 क्रमांकाचा स्टॉल आहे  मुंबईच्या वरळी भागातील चारुशिला जैन-मुरकर यांचा. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांना अस्थिव्यंगत्व आले. या प्रदर्शनात त्यांचा आर्टीफिशियल ज्वेलरीचा स्टॉल आहे. येथे रास्त दरात व उत्तम कलाकुसरीच्या वस्तू महिला ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. या स्टॉलवर दिल्लीकरांसह परदेशी महिलांनीही खरेदीसाठी एकच गर्दी केलेली दिसते. एनएचएफडीसीकडून त्यांनी  एकदा 3 लाखांचे व नंतर 5 लाखांचे कर्ज घेतले व वेळेत त्याची परतफेडही केली. यातूनच 2004 ला त्यांनी लंडनमधून हेअर ड्रेसर, ब्युटीशीयन अर्थात बॅपटेकचा डिप्लोमा केला. प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 20 हजारांहून अधिक दिव्यांग महिलांना प्रशिक्षित केले आहे. दिल्लीत आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, दिल्ली हाट आणि फरिदाबाद येथील सुरजकुंड शिल्प मेळ्यातही गेल्या 20 वर्षांपासून पासून त्यांनी सतत सहभाग घेतला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या हल्ली प्रदर्शनात कमी सहभागी होतात. 2017 मध्ये इंदोर येथील प्रदर्शनानंतर थेट यावर्षी दिल्लीतील प्रदर्शनात त्या सहभागी झाल्या असून ग्राहकांच्या प्रतिसादामुळे त्या समाधानी आहेत.

 

 

 

 

‘एकम फेस्ट’ मध्ये 58 क्रमांकाच्या स्टॉलवर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील गणेश हनवते यांनी तयार केलेल्या लेदरच्या वस्तूंवर ग्राहकांची गर्दी बघायला मिळते. कॅल्शिअमच्या अभावाने 2003 मध्ये श्री. हनवते यांना अस्थिव्यंगत्व आले, त्यांच्या दोन्ही पायात रॉड टाकण्यात आले आहेत. दिव्यांगत्वावर मात करून त्यांनी पंरपरागत चर्मकार व्यवसाय निवडला. एनएचएफडीसीकडून त्यांनी 1 लाखांचे कर्ज घेतले व त्यातून यंत्रसामुग्री व कच्चा माल खरेदी केला. 2006 ते 2016 पर्यंत सलगपणे श्री. हनवते यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, दिल्ली हाट आणि सुरजकुंड शिल्प मेळ्यात सहभाग घेतला आहे. त्यांच्या स्टॉलवर उत्तम गुणवत्तेचे व वैविध्यपूर्ण कलाकुसर असलेले चामड्याचे कमर पट्टे (वेस्ट बेल्ट) आणि चामड्यापासून निर्मित वस्तू आहेत. आपल्या खास संवाद शैलीतून ते ग्राहकांना स्टॉलवरील माल विकत आहेत व रास्त दरात उत्तम वस्तू मिळत असल्याने ग्राहकांनीही या स्टॉलवर एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. 

 

 

 

 

या प्रदर्शनीत 33 क्रमांकाच्या  स्टॉलवर अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील कोल्पेवाडीचे दिनकर गरूडे यांचा मसाले, लोणचे व बिस्कीटांचा स्टॉल आहे. श्री. गरुडे  वयाच्या 8 व्या वर्षी पोलिओग्रस्त झाले. त्यांनी परिस्थितीचा नेटाने सामना केला व आज एक उद्योजक म्हणून ते प्रसिध्दीस आले. एनएचएफडीसीकडून त्यांनी 5 लाखांचे कर्ज घेतले. यातूनच त्यांनी व्यवसाय थाटला व त्यासाठी आवश्यक साधन सुविधा उभारल्या. आजूबाजूच्या परिसरात ते आपला माल पोहोचवितात. त्यासाठी चार चाकी गाड्याही त्यांनी विकत घेतल्या आहेत. राज्यात आयोजित विविध प्रदर्शनातही ते सहभाग घेतात  2014 पासून त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, दिल्ली हाट आणि सुरजकुंड शिल्प मेळ्यात सहभाग घेतला आहे.  त्यांच्या स्टॉलवर आंबा व हिरव्या मिरचीचे लोणचे, कांदा-लसूण मसाला, मालवणी व गोडा मसाला, तसेच काजू, जिरा, स्टार, क्रिम ,नाचणी अशी वैविध्यपूर्ण बिस्कीटेही आहेत. या स्टॉलवरील मसाल्यांसह बिस्कीट व लोणच्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिासाद  मिळत आहे.  

 

9 मार्च 2020 पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे  प्रदर्शन सर्वांसाठी  खुले आहे.

००००

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.51/ दिनांक 6.03.2020

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here