समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर दि. 27 : सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी  संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

श्री. सदानंद महाराज तीर्थक्षेत्र तुंगारेश्वर डोंगर (वसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कोविड काळात बालयोगी सदानंद महाराज संस्थेने या परिसरातल्या लोकांसाठी उत्तम कार्य केले आहे. सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाणे ही परंपरा त्यांनी जोपासली आहे. राज्य सरकार देखील सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी जे निर्णय घेणे आवश्यक आहे, ते आम्ही आतापर्यंत घेतले आहेत. भविष्यातही सर्वसामान्यांचा विचार करूनच आवश्यक ते निर्णय घेतले जातील. सदानंद महाराजांचे कार्य निरंतर चालू राहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.

या आश्रमामध्ये दिघे साहेबांसोबत येत असल्याच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांनी आश्रम संस्थेकडून भविष्यातही अध्यात्मिक मानवी उन्नतीसाठी आवश्यक असणारे सर्व कार्य व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बालयोगी सदानंद महाराज, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई – विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार आदी उपस्थित होते.

*********