वृद्ध सेवाश्रम सांगली संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करू- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

             सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : वृद्ध सेवाश्रम सांगली संस्था लोकसहभागातून निराधार वृद्ध लोकांना सांभाळण्याचे चांगले कार्य करीत आहे. या संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहकार्य करू. संस्थेस खासदार फंडातून १५ लाख रूपये देऊ, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

            वृद्धाश्रमाचे देणगीदार स्वर्गीय विनायक राजाराम लिमये यांच्या नावे पार्श्वनाथ नगर सांगली येथे बांधावयाच्या वृध्द सेवाश्रमाच्या नविन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ व कोनशिला अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वृध्द सेवाश्रम सांगली चे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी महापौर विवेक कांबळे व संगीता खोत, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, प्रकाश काळे, डॉ. उदय जगदाळे, अरूण आठवले, राजेंद्र खरात आदि मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, वृध्द सेवाश्रम सांगली संस्थेने वृध्द लोकांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी घेतली असून ही संस्था सामाजिक कार्य करत आहे. सर्वांनी संस्थेच्या पाठीशी उभे राहून सामाजिक कार्यासाठी आपआपल्या मिळकतीमधून संस्थेस देणगी देणे आवश्यक आहे. जीवनात अनेक संकटे येत असतात. मुलांनी त्यांच्या आई वडिलांना सांभाळणे आवश्यक आहे. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याबध्दल सविस्तर माहिती दिली. तसेच वृध्द सेवाश्रम सांगली संस्थेस ज्येष्ठांबद्दल आदर्श ‍निर्माण करणारी उत्कृष्ट संस्था म्हणून भारत सरकारच्या वतीने २०१३ साली गौरविण्यात आल्याचे सांगितले.

            आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना वृध्द सेवाश्रम सांगली ही संस्था समाजाची गरज ओळखून १९७२ साली चालू केली असल्याचे सांगितले. या संस्थेची नविन इमारतीचे २० हजार स्क्वेअर फूट बांधकाम करण्यात येणार असून ही इमारत ६ मजली असणार आहे. यामध्ये मोठा हॉल, विरंगुळा केंद्र, वृध्दांसाठी दवाखाना, १८ स्वतंत्र खोल्या असणार आहेत. यासाठी २ कोटी ५० लाख रूपये इतका निधी लागणार असून ही इमारत एका वर्षात आत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            स्वागत व प्रास्ताविकात डॉ. उदय जगदाळे यांनी संस्थेच्या कार्याबध्दल सविस्तर माहिती दिली. आभार श्री. गौंडाजे यांनी मानले.