मोका (मॉरिशस) 29: अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता.
मॉरिशसमधील मराठी मंडळी फेडरेशनला महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी 44 दशलक्ष मॉरिशस रुपये अर्थात 8 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. मॉरिशसमधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले. अपार उत्साहात आणि संपूर्णपणे मराठी प्रतिबिंब असलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद प्रामुख्याने उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपरिक पोषाखात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान गोंधळ, शेतकरी नृत्य, पोवाडा यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
यापूर्वी लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानच्या कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच रशियात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस अतिशय भावनात्मक दिवस आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे उभारण्यात आला, याबद्दल मी मॉरिशसच्या पंतप्रधान आणि येथील मराठी समुदायाचा आभारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 12 कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. जलसंवर्धन, समुद्री सामर्थ्य, किल्ले निर्मिती, प्रबंधन, अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील त्यांचे सामर्थ्य आणि चातुर्य आजही तितकेच मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ‘महाराष्ट्र धर्म’ शिकविला. देव-देश आणि धर्मासाठी जगण्याची शपथ वयाच्या 14 व्या वर्षी घेणारे आमचे हे आदर्श राजे आहेत. भारतीयांच्या मनामनात वीरतेचे बीजारोपण करण्याचे काम महाराजांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केलेल्या विविध घोषणांचे मॉरिशसच्या पंतप्रधानांनी यावेळी स्वागत केले आणि त्यांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करणारे मनोगत व्यक्त केले.
००००