वाहतूक नियमांचे पालन करून अपघात रोखणे सर्वांची जबाबदारी : हेमंत गोडसे

0
11

नाशिक, दिनांक 29 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा): वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होणे शक्य आहे. त्याअनुषंगाने रस्ते अपघात रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन खासदार तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हेमंत गोडसे यांनी केले.

आज भोसला मिलिटरी महाविद्यालयाच्या डॉ. बा. शि. मुंजे सभागृहात ‘रोड सेफ्टी अँड बेस्ट प्रॅक्टिसेस इन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट’ या विषयावरील नवव्या आयोजित परिषदेत ते बोलत होते. या परिषदेस राज्याचे परिवहन विभाग आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, परिवहन उप आयुक्त भरत कळसकर, नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, ऑल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष अशपाक अहमद, कार्यकारी अधिकारी संघटनचे अध्यक्ष परीक्षित पाटील, ऑल इंडिया फेडरेशनचे सचिव वासुदेव भगत यांच्यासह देशातील 15 राज्यातील परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शंभरहून अधिक मोटर वाहन विभागाचे प्रतिनिधी, ऑटोमोबाईल कंपनीचे प्रतिनिधी परिवहन क्षेत्राशी निगडित एनजीओ उपस्थित होते.

खासदार हेमंत गोडसे म्हणाले, नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना देतांना त्यासाठी आवश्यक असलेली चाचणी अधिक प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी वाहनांची तपासणी ही काटेकोरपणे करावी. तसेच रस्त्यावर लावण्‍यात आलेले वाहतूक चिन्हांकीत सूचना फलक, रोड इंजिनिअरिंग व ब्लॅक स्पॉट मध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्‍यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा. रस्ता सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेत असतात. तसेच रस्ता सुरक्षा साठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा याकरीता राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यामध्ये जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनासाठी किमान एक टक्का खर्च करण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी माहिती यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार म्हणाले, रस्ता सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करताना उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावीपणे वापर केल्यास अपघाताच्या संख्येमध्ये गुणात्मक घट होण्यास मदत होईल. तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस वे व समृद्धी महामार्गावर मोटर वाहन विभागातर्फे अपघात रोखण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत साधारण २२ टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रभावी रस्ता सुरक्षा अंमलबजावणी, वाहतूक नियमांची जनजागृती व प्रबोधनाच्या माध्यमातून निश्चितच अपघातांची संख्या कमी होऊ शकते, असा विश्वास आयुक्त श्री. भिमनवार यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या परिषदेत सहभागी झालेल्या १५ राज्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्य संस्कृतीनुसार मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या स्मरणिका मिशन सेफ्टी व रस्ता सुरक्षाबाबत माहिती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. दुचाकी वाहन धारकांना यावेळी हेल्मेटचे वाटप परिवहन विभागामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यकारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष परीक्षीत पाटील यांनी केली तर आभार प्रदर्शन ऑल इंडिया फेडरेशन अध्यक्ष अशपाक अहमद यांनी केले.

0000000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here