महाराष्‍ट्र राज्य स्‍थापनेच्‍या ६३ व्‍या वर्धापन दिनी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते ध्‍वजारोहण

सिंधुदुर्गनगरी दि.1 (जि.मा.का):- आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपूया. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया, अशा शब्दांत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्राच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच,आपल्या सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी प्रयत्‍न करण्याचे आवाहनही केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलिस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  या सोहळ्यास मुख्य जिल्हा न्यायाधीश संजय भारुका, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, नागरिक, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी शुभेच्छा संदेश देताना म्हणाल्या, राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा. तुझा जयजयकार असो. आपल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या मंगल, पवित्र दिनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान व बलिदान दिलेल्या अनेक पुण्यात्म्यांची, समाज सुधारकांची आठवण ठेवून, महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते.

छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले, लोकराजा राजर्षी शाहू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोककल्याणाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच महाराष्ट्राची प्रतिभाशाली वाटचाल सुरु आहे. या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, सैन्यदल, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वच मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करते.

महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. राज्याच्या विकासामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सिहांचा वाटा आहे. शेतकरी,कष्टकरी, कामगार यांनी आपल्या घामातून राज्य प्रगतीपथावर नेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालतं, हे सप्रमाण सिध्द करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना आजच्या कामगारदिनी मी मनापासून शुभेच्छा देते. राज्याच्या जडणघडणीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सर्व कामगार बांधवांचे आभार मानते.  शासनाने 30 एप्रिल 1997 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. याला कालच 26 वर्षे पूर्ण झाली. या निमित्तानेही मी जिल्हावासियांना शुभेच्छा देते.

कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे.

‘जत्रा शासकीय योजनांची’ हा उपक्रम 15एप्रिल ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कृषी, आरोग्‍य, शिक्षण, ग्रामविकास, नगरविकास, समाजकल्‍याण, पशुसंवर्धन अशा सर्व विभागांना विकासाचा निधी दिला आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र तयार करण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ई-ग्रंथालयासाठी 2 कोटी रुपये देण्यात येत आहेत.

राष्ट्रीय अन्नधान्य अधिनियमानुसार शासनाकडून जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेतील 5 लाख 77 हजार 211 लाभार्थी व अंत्योदय योजनेतील 22 हजार 148 शिधापत्रिका याप्रमाणे इष्टांक मंजूर आहे. यांना ई-पॉसव्दारे गहू,तांदूळ या धान्याचा पुरवठा करण्यात येतो. गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजार 679 कुटुंबांना आनंदाचा शिधा पोहचविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंर्गत 167 वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगांना 10 कोटी 99 लाख कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या धमण्या म्हणून ओळख असणाऱ्या एस.टीचेही सक्षमीकरण करण्यात येत असून जिल्ह्यामध्ये लवकरच नवीन 196 इलेक्ट्रीक शिवाई वातानुकुलित बसेस येणार आहेत. याशिवाय 80 नवीन लालपरी गाड्या येणार आहेत. जिल्ह्यातील युवा पिढीला स्वयंरोजगार करता यावा यासाठी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियान आणि आर.पी.एल. अंतर्गत 920 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील 270 उमेदवारांना नोकरी उपलब्ध करुन दिली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 346 जणांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी 8 कोटी 29 लाख 75 हजार इतका मार्जीन मनी प्रस्तावित आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 68 जणांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी 1 कोटी 71 लाख 55 हजार इतका मार्जीन मनी देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण १२ रुग्णालये कार्यरत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय हे १३० खाटांचे असून, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न केलेले आहे. या रुग्णालयाचे ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. जननी सुरक्षा योजनेतर्गंत 586 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. सखी वन स्टॉप सेंटर योजनेतून 145 महिलांना 6 विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. महिला व बाल विशेष सहाय्यता कक्ष (महिला समुपदेशन केंद्र) या अंतर्गंत कार्यरत 3 केंद्राच्या माध्यमातून सन 2022 -23 मध्ये 302 प्रकरणे हाताळण्यात आली आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत विविध योजनांसाठी 14 कोटी 78 लाख इतका नियतव्यय मंजूर होता. तो 100 टक्के खर्च करण्यात आला आहे.

आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपूया. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया,  असे आवाहन करतानाच, जिल्हाधिकाऱ्यांनी, आपल्या सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी नितांत प्रयत्‍न करावा, असे आवाहनही अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परेडचे निरीक्षण केले. नंतर पोलीस दलाने संचलन केले. यामध्ये परेड कंमाडर रामदास पालशेतकर यांनी नेत्तृत्व केले. या संचलनात पोलीस, गृहरक्षक दल, बँड पथक, श्वानपथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, 108 रुग्णवाहिका, सावंतवाडी आणि मालवण अग्नीशमन वाहनांचा समावेश होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांची भेट घेवून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

पुरस्कार वितरण

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्यावतीने अर्पिता मुंबरकर यांना 2013-14 मधील तर प्रज्ञा ढवण यांना 2014-15 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्ताने समाज कल्याण विभागामार्फत  घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृत्तीय व उत्तेजनार्थ राम बिबवणेकर, कुंदा कांबळे, श्रावणी मेस्त्री, मृदुला चव्हाण, वक्तृत्व स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृत्तीय व उत्तेजनार्थ योगिनी‍ तिर्लोटकर, आर्यन कदम,  दिप्ती जोशी, पियुष हिवाळे, निबंध स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृत्तीय व उत्तेजनार्थ शुभांगी लोहार, चेतन चव्हाण, प्राजक्ता जाधव, राहूल चव्हाण यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचबरोबर यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारत स्काऊट्स आणि गाईड्स कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुवर्णबाण परीक्षेत पुरस्कार मिळवणाऱ्या दिया परब, इंशात परब यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख कार्यालयाकडून निवड झालेल्या गट क संवर्गातील सौरभ सरनोबत, हर्षदा पोईपकर, पल्लवी सुतार, जयश्री बहिराम, संतोष राऊळ यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय दहिफळे, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख डॉ. विजय वीर, यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.