शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न- पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.01(जिमाका) : शेती व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवत आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजना, मागेल त्याला फळबाग, पिक विमा 1 रुपयात, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, अशा विविध योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

समता मैदान येथे महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या आणि अंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पालकमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या पथसंचलनाचे पालकमंत्री यांनी निरिक्षण केले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन साजरा करताना राज्याने केलेली प्रगती सर्वाना आश्चर्यचकित करणारी आहे. केवळ शेजारी राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाच्या एकंदर विकासासाठी महाराष्ट्र राज्य दिशादर्शक ठरत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे सांगुन शिंदे सरकारने सादर केलेल्या पहिल्याच अर्थ संकल्पात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

यामध्ये केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहिर केली आहे. केंद्र  सरकारच्या वार्षिक 6 हजार  रुपयांसोबतच आता राज्य सरकार सुद्धा 6 हजार रुपये प्रती वर्ष देणार आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये महासन्मान निधी मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यातील 3 लक्ष 52 हजार  शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

त्याचबरोबर यापुढे पीक विमा योजनेसाठी शेतकरी हिस्सा शासन भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा काढता येणार आहे. याशिवाय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुद्धा यापुढे विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न देता शासन स्वतः  शेतकऱ्यांच्या कुंटुबियांना  लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवित आहे. फळबाग लागवड वाढविण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या धर्तीवर आता ‘मागेल त्याला फळबाग’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी शासनाने प्रथमच सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई दिली. जिल्ह्यातील 59 हजार 689 शेतकऱ्यांना  44 कोटी 99 लक्ष 14 हजार 713 रुपये शेतकऱ्यांच्या  खात्यात जमा झाले आहे.

यासोबतच नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मे महिन्यापासून या धोरणाची राज्यात व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  राज्य शासनाच्या या क्रांतिकारी  निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होऊन त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न आवाक्यात येईल.

ग्रामीण भागात  स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार होण्यासाठी आणि प्रशासकिय सेवेत आपल्या जिल्ह्यातील मुलांची टक्केवारी वाढण्यासाठी ‘गाव तिथे वाचानालय’ निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 4 कोटी 50 लक्ष रुपयांना मान्यता दिली आहे. या वाचनालयात स्पर्धा परीक्षेची उत्तमोत्तम पुस्तके युवकांना गावातच उपलब्ध होतील.

केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘जल जीवन मिशन’ मध्ये आपल्या जिल्हयाने उत्कृष्ट कामगिरी केली असुन आतापर्यंत 3 लक्ष 50 हजार कुटुंबाच्या घरी नळ जोडणी झाली आहे. उर्वरित 1 लक्ष 72 हजार नळ जोडण्या मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर या योजनेचा पाठपुरावा आणि नियोजन केल्यामुळे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे.

 

अन्नधान्य वितरण व्यवस्थेत यवतमाळ जिल्हयाने अंत्योदय, प्राधान्य व शेतकरी अशा सर्व योजनांच्या 6 लक्ष 10 हजार 768 शिधापत्रिका धारकांच्या 22 लक्ष 77 हजार 310 लाभार्थाची 100 टक्के आधार जोडणी केली आहे. 100 टक्के आधार जोडणी करणारा यवतमाळ हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

सर्व योजनांचा लाभ एका छताखाली देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शासकीय योजनांची जत्रा: सर्व सामान्यांच्या विकासाची यात्रा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला  आहे. 15 एप्रिल ते 15 जून यादरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत असून आपल्या जिल्ह्यातील सर्व विभागाच्या योजनांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्य  किमान 75 हजार लाभार्थ्यांना आपण एकाच वेळी विविध योजनांचा  लाभ देणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

माजी सैनिकांच्या कल्याणार्थ ध्वजदिन निधी संकलन करण्याचे उदिष्ट जिल्ह्याने 100 टक्के पुर्ण केले यासाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले स्मृतिचिन्ह पालकमंत्री यांच्याहस्ते जिल्हाधिकारी तसेच प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सविता चौधर यांना प्रदान करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची यशोगाथा या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास मुंडे, विजया पंधरे, सहाय्यक  पोलीस उपनिरिक्षक परिवहन विभाग प्रमोद जिड्डेवार, पालीस हेडकॉन्स्टेबल निलेश दायमा, पोलीस चालक नरेश राऊत तसेच आदर्श तलाठी गणेश तेलेवार, राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धा परितोषिक अंतर्गत तलाठी श्रीमती दिपाली आंबेकर यांना महाराष्ट्र शासनाचा तृतिय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुळव्याध या आजाराच्या सर्वाधिक शल्यकर्म चिकित्सा करण्याचे विक्रमी कार्य केलेल्या डॉ. अंजली गवार्ले यांची नोंद इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. यासाठी त्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण, जिल्हा आर्थिक विकास महामंडळातर्फे सामाजिक कार्यासाठी पुरस्कार तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

00000000000