नवीन इमारतीमुळे पक्षकाराला विनाविलंब न्याय मिळेल- न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी

परभणी, दि. 5 (जिमाका) : न्यायदानाचे पवित्र कार्य गतिमानतेने पूर्ण व्हावे, यासाठी पायाभूत सुविधांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाला सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा नूतन इमारतीची गरज होती. या इमारतीचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होऊन पक्षकाराला विनाविलंब न्याय मिळेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. परभणी येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन व कोनशीला अनावरण समारंभ आज पार पडला. त्यावेळी न्यायमूर्ती श्री. सूर्यवंशी बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा न्यायाधीश -१ श्रीमती संध्या नायर व ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. दे. बा. नांदापूरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थांच्या विकासविषयक कामांमध्ये वैयक्तिक हित आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून संस्थेचे हित लक्षात घेतले पाहीजे.  सध्या न्यायालयाचे काम भरपूर वाढले असून पायाभूत सुविधा पूर्वीप्रमाणेच आहेत. म्हणून येथे नवीन इमारतीची अत्यंत आवश्यकता होती. ही इमारत निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करून न्यायमूती श्री. सुर्यवंशी म्हणाले की, पालक न्यायमूर्ती म्हणून आम्ही दोघेही आवश्यक ते सहकार्य करून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू. याकामी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून, त्याशिवाय न्यायदानाचे काम परिणामकारकरित्या पार पाडता येणार नसल्याचे न्यायमूर्ती सुर्यवंशी म्हणाले.

बार आणि बेंच एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, वकिलाच्या सहकार्याशिवाय न्यायदानाचे काम पूर्ण क्षमतेने पार पाडणे अशक्य आहे. त्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेचे घटक असल्याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे. सोबतच न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याचा सार्थ अभियान असायला हवा. तरुण वकिलांना ज्येष्ठ विधिज्ञ दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतात; यापुढेही ते मार्गदर्शन करत राहतील, असा विश्वास न्यायमूर्ती सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.

नूतन इमारत कोनशीला अनावरणाचा क्षण अत्यंत आनंद आणि गौरवाचा आहे, असे सांगून कंत्राटदारानेही न्यायदानाच्या वास्तूचे बांधकाम करत असल्याच्या शुद्ध भावनेने चांगले व वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे न्यायमूर्ती सुर्यवंशी यावेळी म्हणाले.

न्यायदानाचे पवित्र कार्य कुठेही करता येते. मात्र न्यायालय परिसरातील वातावरण चांगले राहिल्यास त्याला गतिमानता येते. ती गतिमानता येऊन प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली निघावीत, यासाठी सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालयेही नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रकरणे विनाविलंब निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे परभणी येथे सर्व सोयीसुविधांनी युक्त इमारतीची आवश्यकता होती, ती आता पूर्ण होत असल्याचे न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.

संत गाडगेबाबा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्य व जनजागृतीबाबत सांगून मुलांना मोबाईलपासून दूर ठेवत, त्यांना पुस्तक वाचनाकडे वळवण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांनी केले. मुळात न्यायालयात प्रकरणे येण्यापूर्वी ती परस्पर आपसी किंवा मध्यस्थांमार्फत मिटविण्याच्या प्रयत्न केला पाहीजे. त्यातून कौटुंबिक स्वास्थ्य लाभते व त्यामुळे समाजात शांतता प्रस्थापित होते आणि न्यायालयीन प्रकरणे कमी करता येतील, असे ते म्हणाले. येथील न्यायालयाची जुनी इमारत कामकाजाच्या दृष्टीने अपुरी कमी पडत होती. त्यामुळे येथे नवीन वास्तू होणे आवश्यक होते. ही पाच मजली वास्तू सर्व सोयीसुविधांनी युक्त राहणार असल्याचे ते म्हणाले.

न्यायालयीन कामकाज पार पाडताना, प्रकरणे एकाच ठिकाणी का पडून आहेत. त्याचे सर्व संबंधितांनी आत्मचिंतन करण्याकडे न्यायमूर्तींनी लक्ष वेधले. तसेच प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढून न्यायदानाचे काम करण्याबाबत न्यायमूर्तीं खोब्रागडे यांनी सांगितले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून न्यायालयीन वास्तूबाबत सविस्तर माहिती विशद केली. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीमती स्वाती दाभाडे, तहसीलदार गणेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, श्री. इटकर यांच्यासह ज्येष्ठ विधीज्ञ व वकील यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांना जलार्पण करून करण्यात आली. जिल्हा वकील संघ, सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार, जिल्हा सरकारी अभियोक्ता कार्यालय आणि विविध तालुका वकील संघाच्यावतीने न्यायमूर्तीव्दयींचा शाल, श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

गांधी विद्यालयाच्या वैष्णवी खापरे, वेदिका मुंढे, आर्या गिराम, साक्षी अमिलकंठवार, तबला वादक विष्णू टोणपे, पीयुष निलंगे, पेटीवादक वैष्णवी देशमुख यांनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन पेडगावकर आणि श्रीमती कामने यांनी तर आर. एन. काझी यांनी उपस्थितांचे आभार मानले

               परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीबाबत माहिती

  • पाच मजली नियोजित नूतन इमारत असून, ६८ कोटी ७९  लक्ष  ८ हजार रुपये खर्चाला मान्यता
  • सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग व सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्या देखरेखीखाली होणार काम
  • २ डिसेंबर २०२१ ला मिळाली प्रशासकीय मान्यता
  • रेन, रुफ वॉटर हार्वेस्टिंग, दिव्यांगाकरिता सरकता जिना, पाणीपुरवठा
  • तळमजल्यावर राहणार महिला आणि पुरुषांसाठी लॉकअप, मुद्देमाल रुम, रेकॉर्ड रुम, बँक, पोस्ट ऑफिस, एटीएम, कॅन्टीन, न्यायाधीशांसाठी वाहनतळ व्यवस्था
  • इतर मजल्यांवर कोर्ट हॉल, न्यायधीशांसाठी कॉन्फरन्स रुम, ग्रंथालय, ऑफिस, व्हीसी रुम, महिला व पुरुष वकील संघासाठी स्वतंत्र खोली आदी सुविधा राहणार आहेत.
  • या इमारतीमध्ये एकूण 22 कोर्ट हॉल असतील.
  • इमारतीचे बांधकाम 2 वर्षात पूर्ण होणार.