१०० सेकंद कोल्हापूर जिल्हा स्तब्ध; लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

◆ शाहू महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले
◆ गावे, संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांकडून ठिकठिकाणी लोकराजाला अभिवादन
◆ सर्व प्रकारची वाहतूक थांबून कोल्हापूर स्तब्ध
◆ शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालये, शैक्षणिक व विविध संस्थांमध्ये अभिवादन

कोल्हापूर, दि.6 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त आज शनिवारी 6 मे रोजी सकाळी 10 वाजता अवघे कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्ध झाले.. गतवर्षी प्रमाणे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अनोखी मानवंदना देत कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचे स्मरण केले.

शाहू स्मृती स्थळ येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करुन शाहू महाराजांना अभिवादन केले. याठिकाणी आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिक यांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले. याठिकाणी शाहूंप्रेमींनी दिलेल्या “श्री शाहू महाराज की जय ..!” या जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमून गेला.

सकाळी ठिक 10 वाजता रस्त्यांवरील एस.टी. बसेससह चौकाचौकातील सिग्नलवरील अन्य वाहने, जागेवर थांबली होती. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बँकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.

• ड्रोनद्वारे अनोख्या अभिवादन उपक्रमाची क्षणचित्रे
• शहरातील प्रमुख चौकांसह संपूर्ण शहर व जिल्हा 100 सेकंदासाठी स्तब्ध
• 100 सेकंद अभिवादन कालावधीत जिल्ह्याने अनुभवली अनोखी शांतता.
• जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय यंत्रणा, संस्था, संघटना व लोकसहभागातून उपक्रम.
00000