कौशल्यावर आधारित शिक्षण- प्रशिक्षणातून उद्योजक बना – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आवाहन

0
11

सांगली दि. 6 (जिमाका) :-  विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण व प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावे,असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  श्री. देशपांडे,श्री. जमीर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होईल,  त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून घेऊन आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढे यावे. युवकांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. रोजगाराभिमुख चांगले शिक्षण घेऊन रोजगार देणारे बना, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तरुण वर्गाला रोजगार मिळून देण्यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन  आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.

प्राचार्य देशपांडे यांनी स्वागत करून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संदर्भात माहिती दिली. प्रत्येकात वेगळी गुणवत्ता असते, तिचा आपल्या करिअर मध्ये उपयोग करावा  या बाबतची माहिती प्रास्ताविकात दिली.

या शिबिरात आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांना करिअर विषयक  संधीं संदर्भात हर्षल पाटील, संदीप पाटील, श्रीमती निशा पाटील, ऋषिकेश जाधव आणि  प्रवीण बनकर यांनी मार्गदर्शन केले.

००००० 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here