‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमातून इंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचेल – कान्हुराज बगाटे

मुंबई, दि. 8 : ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमाच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचेल, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे  नियंत्रक (शिधावाटप) व संचालक (नागरी पुरवठा) कान्हुराज बगाटे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३) समारोप कार्यक्रमात श्री. बगाटे बोलत होते.

यावेळी बीपीसीएल गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. (गेल) चे व्यवस्थापक शंतनू बासू, कार्यकारी संचालक अनिलकुमार पी, इंडियन ऑइलचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित धक्रास, राजीव श्रेष्टा, एचपीसीएल चे व्यवस्थापक अकेला वि. एन. एस. के. लक्ष्मणराव, ऑलिम्पिक प्रशिक्षक तुषार खांडेकर, तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक संतोष निवेंदकर, अतिरिक्त संचालक नंदन गजभिये यावेळी उपस्थित होते.

श्री. बगाटे म्हणाले, आज भारत देश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येबरोबरच सर्वाधिक ऊर्जा वापरणारादेखील देश आहे. वाढत्या ऊर्जा वापराबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढत आहे. कार्बनचे वातावरणातील वाढते प्रमाण हे पृथ्वीवरील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. नैसर्गिक इंधन वापरताना सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे असेही श्री.बगाटे म्हणाले.

ऑलिम्पिक प्रशिक्षक श्री. खांडेकर म्हणाले, सक्षम महोत्सव या शब्दाचा अर्थ नव्या पिढीला समजत आहे हीच मोठी गोष्ट आहे. भारताला विकासात पुढे नेण्यासाठी शाश्वत विकासासाठी  इंधन बचतीची गरज आहे आणि शालेय मुलांपासून याची सुरूवात झालेली ही गोष्ट निश्च‍ितच आनंदाची आहे असेही श्री.खांडेकर म्हणाले.

या कार्यक्रमात इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध  नाटिकांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध वादविवाद इतर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. निवदेन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले. अतिरिक्त संचालक  दीपक वाघ यांनी आभार मानले. यावेळी सक्षम २०२३ मध्ये १००० पेक्षा जास्त विविध उपक्रमांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली.

*****

संध्या गरवारे/विसंअ/