जिल्हा वार्षिक योजनेमधील निधीच्या खर्चाचे यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना

सांगली दि.१२ (जि.मा.का.) :- जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणारा नियतव्यय त्या-त्या योजनांवर विहित वेळेत पूर्णपणे खर्ची होण्यासाठी यंत्रणांनी आत्तापासूनच नियोजन करावे, अशा सूचना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न झाली. या सभेस  खासदार धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विश्वजीत कदम, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  निखील ओसवाल, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सन २०२३-२०२४ साठी जिल्ह्यास  जिल्हा वार्षिक योजनेतून ४९१.०१ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.  हा मंजूर निधी त्या-त्या  विकास  कामांवर विहित वेळेत खर्च झाला पाहिजे.  या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासूनच यंत्रणांनी याचे नियोजन केल्यास संपूर्ण निधी विकास कामांवर खर्च होईल.

सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून ४०५ कोटी नियतव्यय मंजूर आहे. यामध्ये गाभा क्षेत्रासाठी २४० कोटी १९ लाख ९९ हजार, बिगर गाभा क्षेत्रासाठी १०९ कोटी ६० लाख, नाविन्यपूर्ण योजनेसाठी १९ कोटी २० लाख तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ३६ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उप योजनेसाठी ८५ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील  योजनेसाठी १.०१ कोटी  नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.

सन २०२२-२०२३ वर्षात सर्वसाधारण योजनेत ३६४ कोटी, अनुसूचित जाती उप योजनेसाठी ८३.८१ कोटी आणि आदिवासी घटकसाठी १.०१ कोटी असा ४४८.८२ कोटी नियतव्यय मंजूर होता. यामधे जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) याजनेतून ३६३.५७ कोटी निधी खर्च झाला असून खर्चाची ही टक्केवारी ९९.८८ टक्के इतकी आहे. अनुसूचित जाती घटक योजनेमध्ये ८३.८१ कोटी खर्च झाला आहे. खर्चाची ही टक्केवारी १०० टक्के इतकी आहे. तर आदिवासी घटक योजनेत ०.४० कोटी खर्च झाला आहे. खर्चाची ही टक्केवारी ३९.६० टक्के इतकी आहे. यंत्रणांनी विकास कामांवर निधी विहित कालावधीत केल्याबद्दल बैठकीत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

शेतकऱ्यांना विजेची समस्या उदभवू नये यासाठी विद्युत वितरण कंपनीने नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करावेत.  ज्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे त्याची मागणी करून तेही त्वरित सुरू करावेत.  मे अखेर ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व नवीन बसविण्याचे काम करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.  समाधानकारक पाऊस होईपर्यंत पाणी उपसा योजना सुरू राहणार आहेत. त्यामुळे विजे अभावी पाणी पुरवठा योजना बंद राहणार नाहीत याची दक्षता विद्युत वितरण कंपनीने घ्यावी.

जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे काम राज्यात आदर्शवत व्हावे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी ही योजना जिल्ह्यात प्रभावी व  गतीने राबवावी. यासाठी संबंधित यंत्रणांनी  या योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. प्रशासनानेही प्राप्त प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, अशा सूचना  पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.

महिला बाल विकास विभागाने १८ वर्षाखालील अनाथ मुलांची माहिती संकलित करून त्यांना शासन योजनेतील निकषानुसार आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी या बैठकीत दिल्या.