पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार

0
5

पुणे दि.१४- पुढील  वर्षी राज्य शासनाच्या वतीने किल्ले पुरंदर येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात  येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 

किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी अधिकारी मिनाज मुल्ला , उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील . गटविकास अधिकारी अमर माने, पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. 

गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज जयंती नियमितपणे साजरी केल्याबद्दल पंचायत समिती,पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन करून पालकमंत्री पाटील म्हणाले, परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. 

छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे.  अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. 

आमदार जगताप म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज कुशल प्रशासक होते. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी यात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

श्री.शिवतारे म्हणाले,छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केले. स्वराज्य आणि स्वधर्म प्रेमाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि विचारांचे अनुसरण करण्याची गरज आहे. 

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाई जिंकली. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व  होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढू बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल. 

कार्यक्रमपूर्वी सुवासिनींनी बाल शंभुराजेंचा पाळणा म्हटला. मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. तत्पूर्वी पालकमंत्री श्री.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here