सातारा दि. 15 : दौलतनगर ता.पाटण जि.सातारा येथे शासन आपल्या दारी -२०२३ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी सुमारे १९ हजार लाभार्थ्यांना १३ मे रोजी किंवा त्यापूर्वी लाभ देण्यात आला. उर्वरित सुमारे ८ हजार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घरी किंवा गावात स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत पुढील ८ दिवसात लाभ पोहोचविण्यात येणार आहे.
या अभियानासाठी विविध विभागांकडून सुमारे 27 हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. या लाभार्थ्यांचा विभागनिहाय निश्चित केलेली लाभार्थी संख्या, वाटप /लाभार्थी संख्या व घरोघरी जाऊन लाभ देणे शिल्लक संख्यांचा तपशिल अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.
महसूल विभाग पाटण – 10622 – 5513 – 5109, महसूल विभाग कराड(सुपने मंडळ)- 1393 – 1294 – 99, पंचायत समिती पाटण – 9371 – 8042 – 1329, पंचायत समिती कराड(सुपने मंडळ) – 86 – 58 – 28, तालुका कृषि अधिकारी कराड(सुपने) – 257 – 166 – 91, तालुका कृषि अधिकारी पाटण – 1295- 882 – 413, नगरपंचायत पाटण – 400 – 150 – 250, महावितरण तारळे/पाटण/मल्हारपेठ – 657 – 350 – 307, वनविभाग पाटण – 60 – 26 – 34, ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी/ पाटण-चष्मा वाटप – 99 – 43 – 46, दुय्यम निबंधक कार्यालय पाटण 117 – 90 – 27, वेलफेअर बोर्ड सातारा 836 – 716 – 120, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय सातारा जिल्हा – 19 – 0 – 0, जिल्हा रुग्णालय कराड/PHC सुपने 10 – 10 – 0, अण्णासाहेब आर्थीक विकास महामंडळ 38 – 36 – 2, पंडित दिन दयाळ उपाध्याय महा रोजगार मेळावा 700 – 498 – 0, आरोग्य शिबीर 1200 – 1133 – 0, बँक ऑफ महाराष्ट्र 2 – 2- 0 असे एकूण एकंदर 27162 – 19009 – 7855.
या अभियानाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील खेडोपाडी व दुर्गम भागात प्रशासन पोहचले. शैक्षणिक कारणासाठी नेहमी लागणारा जातीचा दाखला ,उत्पन्नाचा दाखला ,डोगरी व दुर्गम भागातील दाखला ,रहिवास दाखला , नोकरीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा भूकंपग्रस्त दाखला इत्यादी विविध सुमारे १०००० पेक्षा अधिक दाखल्याचे महसूल विभागामार्फत वितरण करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होताना विद्यार्थ्यांची दाखला मिळविण्याची धावपळ या निमित्ताने निश्चितपणे कमी होणार आहे. जे विद्यार्थी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दिवशी हजर राहू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांचे मार्फत घरपोच करण्यात येत आहे.
या अभियानाच्या शुभारंभाच्या दिवशी दौलतनगर ता.पाटण येथे अद्यावत आरोग्य सुविधेसह आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील सुमारे १००० पेक्षा अधिक व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला.
याच अभियानाचा एक भाग म्हणून व पाटण तालुक्यातील सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्द्ध व्हावी म्हणून दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेत बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक सभागृह येथ पंडीत दिनदयाळ उपाध्याय महा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते . या प्रसंगी विविध कंपन्याचे सुमारे २६ प्रतिनिधी तसेच महामंडळ व व्यवसाय योजनेचे ९ प्रतिनिधी उपस्थित होते . यावेळी परिसरातील सुमारे ५०० उमेदवारांनी या ठिकाणी भेट दिली. त्यापैकी १५ उमेदवारांना जागेवरच रोजगार प्राप्त झाला असून सुमारे २५१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे .
पाटण तालुक्यातील अनेक युवक मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये सुधारित शासन निर्णय निर्गमित करून भूकंपग्रस्तांच्या पणतू ,खापर पणतू यांना देखील लाभ अनुज्ञेय केला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्ताच्या चौथ्या पिढीला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्या मुळे सुमारे १५ वर्षानंतर न्याय मिळाला असून त्यांना ह्या दाखल्याच्या आधारे शासकीय नोकरीत प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे . या शासन निर्णयानुसार आत्तापर्यंत २०० पेक्षा अधिक पणतूना दाखले दिले आहेत. त्यामुळे शासकीय नेाकरी मिळविण्याच्या भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नितीन जगन्नाथ भिसे रा मल्हारपेठ यांचे अनेक वेळा प्रयत्न करूनही निवड होत नव्हती. नितीन भिसे ह्याची तर आठ वेळा प्रयत्न करूनही निवड होत नव्हती. भूकंपग्रस्त दाखल्यामुळे त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे . त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धन्यवाद दिले आहेत.
कामगार कल्याण विभागाकडून या निमित्ताने पाटण मधील सुमारे ७२० अकुशल कामगारांना अत्यावशक व सुरक्षा संच (हेल्मेट ,बूट ,बॅटरी इत्यादी ) पुरविण्यात आले आहे .त्यामुळे त्यांच्या कामाची गुणवत्ता तर वाढणार आहेच शिवाय त्यांना सुरक्षितरित्या काम करण्यास मदत होणार आहे.
याशिवाय कृषी विभागामार्फत, ट्रॅक्टर, पावर टिलर, इत्यादी विविध औजाराचे वितरण केल्याने शेतकऱ्यांना शेतीकामात निश्चितपणे मदत होणार आहे. समाजकल्याण विभागामार्फत सुमारे ३५ दिव्यांग व्यक्तींना व्हील चेअरचे वाटप करून दिव्यांगांप्रति महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे . याशिवाय सुमारे १०० अंध व्यक्तीना आरोग्य विभागामार्फत चष्म्याचे वाटप करून त्यांना नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न शासनाने या अभियानाच्या माध्यमातून केला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी रमाई आवास योजना शासनाची महत्वाकांशी योजना आहे .पाटण तालुक्यात होणारी अतिवृष्टी व दुर्गमता लक्षात घेता स्वत:च्या हक्काचे पक्के घर असणे खूप महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने तालुक्याकरिता मुख्यमंत्री यांनी विशेष बाब म्हणून या योजनेअंतर्गत सुमारे १५० घरकुलांना (१.८० कोटी रु ची) मान्यता दिली . त्यामुळे पाटण तालुक्यातील १५० कुटुंबाना स्वत:च्या हक्काचे घर लवकरच उपलब्ध होणार आहे.
|