‘शासन आपल्या दारी’ अंर्तगत पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण; आधार जोडणी करण्याचे आवाहन

नागपूर,दि. १६ : सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित दारी यांचा निपटारा करणेकरीता 15 एप्रिल पासून 15 जून 2023 या कालावधीत “शासन आपल्या दारी” हे अभियान राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या काळात नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत 15 एप्रिल ते 15 जुन 2023 या कालावधीत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिधापत्रिका सेवा विषयक बाबीबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहचावी व लाभार्थ्यांना विभागामार्फत योग्य सहकार्य व्हावे यासाठी पात्र लाभार्थ्यांनी तालुका कार्यालयास संर्पक करण्याचेही आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी केले आहे.

या कालावधीत पुरवठा विभागामार्फत अंत्योदय अन्न योजनेसोबतच प्राधान्य कुटुंब योजनेंर्तगत पात्र लाभार्थ्याना शिधापत्रिकाचे वितरण करणे, नवीन शिधापत्रिका तयार करणे, दुय्यम शिधापत्रिका उपलब्ध करुन देणे, तसेच शिधापत्रिकेतील नावे कमी जास्त करणे, आधार क्रमांक नसलेल्या लाभार्थ्यांची नावे वगळणे, मरण पावलेले लाभार्थी तसेच लग्न झालेल्या मुलीबाबत आरसी अद्यावत करणे, ही कामे प्रामुख्याने करण्यात येणार आहे.

या कालावधीत जिल्हास्तरावरील प्रलंबित असलेल्या शिधापत्रिकाबाबत सर्व अर्जांचा निपटारा मोहीम स्वरुपात करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या कालावधीत प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशीनिगडीत असणा-या शिधापत्रिकाबाबत सर्व सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्यात येणार आहे.

या योजना कालावधीत नागरीकांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शिबिरे आयोजित करणे, गावात दवंडी देणे तसेच क्षेत्रीय भेटी देणे अशा प्रकारच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी नागपूर यांनी दिल्या असून ज्या लाभार्थ्याचे आधार सिडींग झाले नाही अशा लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन E-kyc द्वारे आधार सिंडीग करुन घ्यावे, आपले मोबाईल क्रमांक शिधापत्रिकाशी संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जनतेला केले आहे.

000