मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला

अलिबाग, दि. १८( जिमाका) :- भारत देशाला लांबच लांब समुद्रकिनारे लाभले आहेत. या सामुद्रिक संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहोत, असे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला यांनी काल (१७ मे ) रोजी करंजा जेट्टी, उरण येथे केले.
सागर परिक्रमा कार्यक्रम २०२३ अंतर्गत पाचव्या चरणाचा शुभारंभ उरण तालुक्यातील करंजा जेट्टी येथून संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, केंद्रीय मंत्री महोदयांच्या पत्नी श्रीमती रुपाला, केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.अभिलाष लेखी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे, सहसचिव डॉ.जे.बालाजी, श्री.पंकज कुमार,भारतीय तटरक्षक दलाचे डीआयजी अनुराग कश्यप, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम केंद्रीय मंत्री श्री.रूपाला यांनी मच्छीमार बांधवांनी, माता- भगिनींनी त्यांच्या केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानून ते पुढे म्हणाले की,केंद्र शासन मच्छीमार बांधवांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. मच्छिमार बांधवांसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे, त्याचा लाभ सर्व मच्छिमार बांधवांनी जरूर घ्यावा.
या सागर परिक्रमा कार्यक्रमांतर्गत मच्छिमार बांधव, त्यांच्या सर्व संघटना यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या ज्या समस्या, जे प्रश्न, त्यांच्या मागण्या समोर येतील, त्या समस्यांची आणि शासनाच्या योजनांची व धोरणांची योग्य ती सांगड घालण्यात येईल. त्यात ज्या काही सुधारणा आवश्यक आहेत त्या निश्चित केल्या जातील, अशी ग्वाही श्री.रूपाला यांनी यावेळी दिली.
संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कौतुक
आपल्या भाषणात श्री.रूपाला यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कौतुक केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मनोरी येथील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीसंदर्भात अत्यंत संवेदनशीलतेने व तत्परतेने घेतलेल्या निर्णयाबाबतचा उल्लेख करून केंद्रात संवेदनशील निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात तसेच काम करणारे मुख्यमंत्री असल्यावर समस्त जनतेचे भले होणारच, देशाचा सर्वांगीण विकास होणारच, असा विश्वास व्यक्त केला.
भारताचे पहिले आरमार उभे करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीस नमन करून केंद्रीय मंत्री श्री.रुपाला यांनी अनेक वर्ष भारतीय नौदलाच्या ध्वजावरील ब्रिटिश राजवटीचे चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलून त्या जागी छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचे चिन्ह प्रदर्शित करण्याचा निर्णय समस्त भारतीयांचा अभिमान उंचावणारा असल्याचे सांगितले.
केंद्र शासनाने चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मच्छीमार बांधवांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तब्बल ६ हजार कोटी रुपयांची अधिकची तरतूद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात श्री.परषोत्तम रूपाला हे मच्छीमार बांधवांना अशा प्रकारे थेट भेट देणारे आणि त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधणारे पहिलेच केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री असल्याचे सांगितले व त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
ते म्हणाले, आपल्या मच्छीमार बांधवांमधील पारंपारिक व अपारंपारिक हा भेदभाव मिटविणे आवश्यक आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मच्छीमार बांधवांच्या हिताचे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, असे सांगून केंद्रीय मंत्री मच्छिमार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिकेत आहेत. अशा वेळी त्यांच्या आवाहनाला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी केंद्रीय मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्री.अभिलाष लिखी, श्री.पंकजकुमार, करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली परिख व नितेश पंडित यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री श्री.परषोत्तम रुपाला व उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते काही मच्छिमार बांधवांना प्रातिनिधीक स्वरूपात मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात आले. त्याचप्रमाणे मनोरी येथील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ५४ लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला.
सागर परिक्रमा कार्यक्रम-२०२३ (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेला दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातपाटी येथून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा “देशाची अन्नसुरक्षा, किनारपट्टीवर निवास करणाऱ्या मच्छिमारांची उपजीविका आणि सागर पर्यावरणाची सुरक्षा” या मुद्यांवर केंद्रित आहे. भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाने (Fisheries Department) ही यात्रा “आजादी का अमृत महोत्सव” चा एक भाग म्हणून आयोजित केली आहे.
या सागर परिक्रमा यात्रेचे हे पाचवे चरण उरण तालुक्यातील करंजा येथून दि.१७ मे २०२३ रोजी सुरू होऊन दि.१८ मे २०२३ रोजी रत्नागिरी येथे समाप्त होईल. ही सागर परिक्रमा यात्रा करंजा, मिरकरवाडा व मिऱ्या बंदर येथे संपन्न होणार आहे. या यात्रेतून प्रगतशील मच्छिमार मुख्यत्वे किनारी भागात निवास करणारे मच्छिमार, मत्स्य शेतकरी, तरुण मत्स्य उद्योजक इत्यादींना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), केसीसी FIDF आणि महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय विषयक योजनांची माहिती दिली जाईल.
या परिक्रमेत राज्याचे मत्स्य अधिकारी, मच्छिमारांचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसायिक, मत्स्य उद्योजक, मत्स्यसंवर्धक, अधिकारी आणि राज्य, देशभरातील मत्स्य शास्त्रज्ञ सामील झाले आहेत. किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मच्छिमार, मस्यव्यवसायाशी निगडित असलेल्या समुदायाशी आणि हितधारकांशी संवाद साधणे, हा या यात्रेचा उद्देश असून ही परिक्रमा संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवरील राज्याच्या समुद्रमार्गातून जाणार आहे.
या कार्यक्रमास मच्छीमार बांधव, मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000