नंदुरबार, दि. २२ (जिमाका): आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व दुर्गम क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जाणार असून आदिवासी भागात सरकारी व खाजगी क्षेत्रातील रूग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना,आरोग्य कर्मींना नियमित वेतन/मानधनाबरोबर रूग्णसंख्येच्या आधारावर प्रोत्साहन भत्ता देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात २० खाटांच्या मॉड्युलर, सुसज्ज अशा अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण समारंभात मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र खेडकर डॉ. राजेश वसावे, डॉ. श्रीमंत चव्हाण,डॉ. नरेश पाडवी, जिल्हा रूग्णालय,वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालयातील आरोग्यकर्मी, विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नेहमी संकटाला संधीत परावर्तीत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. त्यांच्या या प्रोत्साहनातून संपूर्ण देशाने कोरोना संकटात विकासाच्या संधी निर्माण केल्या आहेत. आरोग्य क्षेत्राला त्यामुळे सक्षम होण्याची संधीच त्यांनी निर्माण करून दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कुठल्याही आरोग्य संकटाला सामोरे जाऊ शकेल एवढी सक्षम आमची शासकीय यंत्रणा व वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आज राज्यातील कुठल्याही नवनिर्मित जिल्ह्यातील आरोग्य सविधांमध्ये नंदूरबारची आरोग्य यंत्रणा सर्वोत्तम व सक्षम असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील मोलगी, धडगाव या भागात येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासोबतच जिल्ह्यांच्या मुख्यालयात ज्या आरोग्य सुविधा आहेत, त्या आरोग्य सुविधा तेथे निर्माण करण्याचा मानस असून त्यासाठी आदिवासी विकास विभाग, जिल्हा नियोजन समिती यासारख्या योजनांमधून भरीव तरतूद करण्यात येईल, असे सांगून ते पुढे म्हणाले आरोग्य सुविधांचा रस्ते विकासाशी मोठा संबंध असून रूग्णालये, दवाखाने यांच्यापर्यंत रूग्णास पोहोचण्यासाठी चांगल्या दळण-वळण सुविधांची गरज असते. अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वीर बिरसा मुंडा यांच्या नावाने आदिवासी गाव, पाडे, वस्त्यांना जोडणाऱ्या बारमाही रस्त्यांच्या विकासाची योजना चालू वर्षात सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
दुर्गम भागातही अतिदक्षात विभागांची निर्मिती करणार – डॉ. सुप्रिया गावित
या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यातल्या त्यात अक्कलकुवा, धडगाव, मोलगी या सारख्या दुर्गम भागात रूग्णांना वेळेत निदान आणि वेळेत उपचार मिळण्यासाठी अतिदक्षता विभाग प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय अथवा ग्रामीण रूग्णालयात निर्माण करण्याची आवश्यकता लक्षात घेवून जिथे रूग्णांची संख्या जास्त तिथे लवकरच अतिदक्षता विभाग निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.
आरोग्य सक्षम जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण होतेय – डॉ. हिना गावित
नंदुरबार हा जिल्हा कुपोषण, मात-बालमृत्यु, सिकलसेल यासारख्या आरोग्य प्रश्नांमुळे नेहमी देशभर चर्चेत असायचा परंतु आता एक आरोग्य साधन-सुविधांनी सक्षम असलेला जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची देशात ओळख निर्माण होते आहे. आज १०० विद्यार्थी संख्येचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, स्वतंत्र माता-बाल रूग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे जाळे पाहता कुठल्याही प्रस्थापित जिल्ह्यात एवढ्या वैद्यकीय सुविधा नसतील एवढ्या एकच्या नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. अत्यंत कमी खर्चात राज्यातील पहिलाच सुसज्ज असा मॉड्युलर अतिदक्षता विभाग निर्माण करण्याचे भाग्यही आपल्या जिल्ह्याला लाभले असल्याचेही खासदार डॉ. हिना गावित यांनी यावेळी सांगितले.
दृष्टिक्षेपात अतिदक्षता विभाग लोकार्पण
✅ २० खाटांचा व मॉड्युलर स्वरूपाचा आहे अतिदक्षता विभाग
✅ अत्यंत कमी खर्चात म्हणजे ७ कोटी रूपयात झालेला राज्यातील पहिलाच अतिदक्षता विभाग
✅ आदिवासी भागात रूग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्यकर्मींसाठी स्वतंत्र प्रोत्साहनपर योजना आदिवासी विकास विभाग राबवणार
✅ सुरूवातीलाच १०० विद्यार्थी संख्या असलेले राज्यातील पहिलेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
✅ अतिदुर्गम अशा भागातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांमध्येही अतिदक्षता विभाग निर्माण करणार
✅ गाव, पाडे वस्त्यांना बारमाही जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे निर्माण करणार
०००