‘पुस्तकांचे गाव-भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव- राज्यपाल रमेश बैस

0
8

सातारा दि. २२ – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.

महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख,  भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनिता भिलारे,  सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पुस्तकांचे गाव-भिलार’ पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याचीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकाचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयासही भेट दिली.

०००००

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here