सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 :- ज्ञान आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित ठरत असल्याचे  प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत ‘आयआयटी बॉम्बे’ (मुंबई) आणि

‘आयआयएम’, नागपूर यांच्यासमवेत सामंजस्य करार कार्यक्रम झाला.

यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, ‘आयआयटी’ मुंबई चे संचालक सुभाशीष चौधरी, ‘आयआयएम’ नागपूर चे संचालक भीमराय मेत्री, विशेष कार्य अधिकारी प्रिया खान हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीएम फेलोशिप प्रोग्राम 2015 मध्ये सुरू करण्यात आला. तरुणांचे ज्ञान आणि कौशल्य अधिक वृद्धिंगत करत त्यांना शासकीय यंत्रणेची ओळख करून देणारा हा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्यात येतो. विविध क्षेत्रातील अनेक चांगले फेलोज या योजनेच्या माध्यमातून राज्याला मिळाले. अनेक उच्चशिक्षित तरुण करियरच्या मोठ्या संधी नाकारून या योजनेला प्राधान्य देतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

या कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या फेलोंकडे विविध क्षेत्रातील अनेक नाविन्यपूर्ण कल्पना असतात, ज्याचा राज्याच्या विकासप्रक्रियेत खूप फायदा होतो. सीएम फेलोशिप प्रोग्रामला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली असून आता ‘आयआयएम’ आणि ‘आयआयटी’ सारख्या जगप्रसिद्ध संस्था या कार्यक्रमाशी जोडल्या जात आहेत हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संस्थांच्या मार्गदर्शनाद्वारे सीएम फेलो अधिक कौशल्य व अधिक ज्ञान संपादन करू शकतात. यांसारख्या अन्य संस्थांचाही यामध्ये यापुढे समावेश करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सीएम फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या विकासप्रक्रियेत योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याची तसेच यापुढेही अशाप्रकारच्या सहकार्य कार्यक्रमांत सहभागी होण्यास उत्सुक असल्याची भावना  ‘आयआयटी’ मुंबई चे संचालक सुभाशीष चौधरी व ‘आयआयएम’ नागपूर चे संचालक भीमराय मेत्री यांनी यावेळी व्यक्त केली.

विशेष कार्य अधिकारी प्रिया खान प्रास्ताविकात म्हणाल्या, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम  युवकांना शासनासोबत जवळून काम करण्याची व राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची संधी देतो. शासनासारख्या विशाल यंत्रणेसोबत काम करण्याचा अनुभव हा अत्यंत दुर्मिळ व एकमेवाद्वितीय ठरतो. फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून फेलोंमध्ये विविध कौशल्ये वाढीस लागतात. यामध्ये व्यवस्थापन कौशल्ये, संवाद कौशल्ये, साधन संपन्नता, प्रश्न सोडविण्याचे कसब यांचा समावेश होतो. या अनुभवातून फेलोंना शैक्षणिक व करिअर संबंधातील अनेक संधी उपलब्ध होतात. यावर्षी ‘आयआयटी’, मुंबई व ‘आयआयएम’, नागपूर यांचेसोबत फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या दोन्ही संस्था प्रत्येकी ५०% फेलोंना प्रभावी धोरण निर्मितीसाठी आवश्यक साधने व पद्धती यांचे प्रशिक्षण देतील. प्रत्यक्ष कॅम्पस वर व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जाईल, असेही श्रीमती खान यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये हा कार्यक्रम पुन:श्च सुरु केला आहे.

भारत हा युवा देश आहे आणि तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम युवकांना शासनासोबत जवळून काम करण्याची व राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची संधी देतो. सार्वजनिक धोरणांवर काम करण्याचा अनुभव व त्यातून मिळालेले धडे या कार्यक्रमातील फेलोंसाठी मोलाचे ठरतात. फेलोंच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो. प्रशिक्षण कार्यक्रमाशिवाय, महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत संवाद व विविध संस्थांना भेटींचे आयोजन केले जाते. या संवाद व भेटींच्या माध्यमातून फेलोंना खूप काही शिकता येते. फेलोंनी काम करताकरता शिकणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतात.

——000——