‘समान संधी केंद्र’ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे

मुंबई, दि. 24 : सामाजिक न्याय विभागातर्फे सुरु करण्यात आलेली ‘समान संधी केंद्र’ ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

रुईया कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, रुईया कॉलेजच्या प्राचार्य वर्षा शुक्ला, मुंबई शहरचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, रायगडचे सहाय्यक आयुक्त  सुनील जाधव उपस्थित होते.

डॉ. नारनवरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक अभ्यास न करता बदलत्या तंत्रज्ञानानुसार तंत्रज्ञान अवगत करावे. भविष्याचा विचार करून वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्ञान प्राप्त करावे. शासनाच्या विविध योजनांची माहिती समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना मिळण्यास निश्चित मदत मिळेल. कौशल विकासावर आधारित जपान व भारतामध्ये वेगवेगळ्या बाबतीत केंद्र सरकारचे करार झालेले असून त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये सुद्धा नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. महाराष्ट्रात सुमारे 15 हजार महाविद्यालयात समान संधी केंद्र सुरु करण्यात आली आहेत, असेही यावेळी डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण मुंबई विभाग कार्यालयाने तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा व समान संधी केंद्र या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, रायगड या कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या आस्थापना व लेखा विषयक प्रणालीच्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रकरणाची सद्यस्थिती व नुकसान भरपाई या अँड्रॉईड मोबाईल प्रणालीचे उदघाट्न डॉ. नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

****

संध्या गरवारे/विसंअ/