मुंबई, दि. 26 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे व्यक्तिमत्व दूरदृष्टीचे होते. त्यामुळे त्यांनी नौदलाची उभारणी केली होती. म्हणूनच त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या जलकलश रथयात्रेस हिरवा झेंडा दाखविताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
“श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सहस्त्र जल कलशाभिषेकाचा संकल्प” साठी ११०८ पवित्र जलकलश आणले आहेत. त्याचा जलपूजन सोहळा राजभवन येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जलकलशांचा प्रवास मुंबई ते रायगड असा होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महंत सुधीरदास महाराज, श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या सेवा समितीचे सदस्य सुनील थोरात आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मी शुभेच्छा देतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती सोहळ्याचा एक भाग बनणे हा मी माझा विशेष सन्मान समजतो. किल्ले रायगड येथे 2 जून 2023 रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातील सर्व नद्या, तलाव आणि जलकुंभांमधून पवित्र पाणी गोळा केले जात आहे हे जाणून मला आनंद झाला आहे.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. ते एक दूरदर्शी राजे होते ज्यांनी इंग्रज आणि मुगल यांच्यापासून राज्याला असलेला धोका वेळीच ओळखला होता. परकीय शक्तींनी उभे केलेले आव्हान ओळखून शिवाजी महाराजांनी आपले नौदल उभारले. उद्योग आणि व्यापाराबाबत त्यांचे धोरण दूरदर्शी होते.ते महिला सक्षमीकरण आणि सन्मानाच्या बाजूने होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील भक्कम पायामुळेच महाराष्ट्र महान योद्ध्यांची आणि समाजसुधारकांची भूमी बनला. नुकतेच मी प्रतापगड किल्ल्याला भेट दिली. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठीही मोहीम राबवायला हवी, असेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरित करणारे – मंत्री सुधीर मुनगंटीवार
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वीर माता जिजाऊ यांच्या विचार संस्कारातून श्री छत्रपती शिवाजी महाराज घडले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त राज्याच्या अस्मिताच नव्हे, तर संपूर्ण जगाला त्यांच्या विचारांची मोहिनी पडली. हे विचार आणि कार्य सर्व पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे.किल्ले रायगड येथे 2 जून 2023 रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातील सर्व नद्या, तलाव आणि जलकुंभांमधून पवित्र पाणी संकलित केले आहे. आज राजभवन येथून सुरू झालेल्या या यात्रेमुळे या उपक्रमासाठी चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती होईल. या रथयात्रेच्या माध्यमातून गावोगावी विचार पोहोचवणार, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
मान्यवरांच्या हस्ते यावेळी जलकुंभाचे पूजन करण्यात आले. इतिहासकालीन खेळांचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.
*****
संध्या गरवारे/विसंअ/
Maharashtra Governor flags off Rath Yatra for the Chhatrapati Shivaji Maharaj 350th Coronation Ceremony
Mumbai, 26th May : Maharashtra Governor Ramesh Bais flagged off the Sahastra Jal Kalash Yatra between Mumbai and Fort Raigad ahead of the 350th Coronation Ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj from Raj Bhavan Mumbai on Friday (26 May). The Governor accompanied by Minister of Cultural Affairs Sudhir Mungantiwar performed the Sahastra Jal Kalash Pujan and witnessed the demonstration of martial arts presented by children and youth.
Principal Secretary Culture Vikas Kharge, Karyavahak of Raigad Smarak Mandal Sudhir Thorat, Shri Shiv Rajyabhishek Dinotsav Seva Samiti official Sunil Pawar and Mahant Sudhirdas Maharaj were present on the occasion.
The water from the Jal Kalash collected from various rivers across the country will be used for the 350th Coronation Ceremony.
0000